धाराशिव – समय सारथी
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराच्या बदनामीचे षड्यंत्र रचले गेले आहे. तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी आणि यामागील सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने 1 हजार 865 कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा मंजूर केला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारने हा अभूतपूर्व निधी मंजूर केला आहे. आराखड्यास मान्यताही देण्यात आली आहे, असे असताना तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे असा आरोप केला आहे.
या ऐतिहासिक कार्यासाठी शून्य योगदान असणारे महायुतीतीलच काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाबाबत भाविकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होत आहे. तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे षडयंत्र तातडीने उघड होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले आहेत.
तुळजाभवानी देवी मंदिरातील जीर्णोध्दार व परिसरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक होत असलेला अपप्रचार थांबविण्यासाठी संबंधितांची तातडीने बैठक घेण्यात यावी आणि या षडयंत्राची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. हा अपप्रचार थांबविण्याच्या दृष्टिने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक व पर्यटनमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.