धाराशिव – समय सारथी
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढील महिन्यात धाराशिव येथे आढावा बैठक घेणार आहेत, धाराशिव दौऱ्यात जिल्ह्यातील विविध बाबींचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी अनेक समस्या दिसुन आल्याने त्यात सुधारणा कराव्या अश्या सुचना दिल्या. प्रशासकीयसह राजकीय मुद्यावर त्यांना आलेल्या अनुभवानंतर त्यांनी पुढील महिन्यात आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात ते पत्रकारांशी 1 तास विशेष संवाद साधणार असून त्यांनी तसे निमंत्रण दिले आहे.
धाराशिव येथील जनता दरबारात तब्बल 500 पेक्षा जास्त तक्रारी आल्या, त्यात जनतेने सामान्य प्रश्न मांडले, शेतरस्ते, सात बारा असे प्रश्न लोकांनी मांडले त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला खडेबोल सुनावीत कान टोचले आणि कृती कार्यक्रम आखून दिला.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद पिटू गंगणे यांनी नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांचा सत्कार केला. मंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारत स्तुतीसुमने उधळली. या प्रकारानंतर राज्यभर चर्चा व टीका झाली. नागरी सोहळ्याच्या आयोजकाबाबत मंत्र्यांना अंधारात ठेवले त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी न सांगितल्याने ते तोंडावर पाडले व राज्यभर टिकेचे ‘धनी’ झाले. भाजप सारखा शिस्तप्रिय पक्षाची प्रतिमा मलीन झाली.
मंत्री बावनकुळे यांच्या समोर आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, पोलिसांनी कोर्टात दिलेले शपथपत्र देतो म्हणाले पण प्रत्यक्षात पोलिसांचा तक्रारीतील पुरवणी जबाब दिला, त्यातही त्यांची दिशाभूल झाली. अनपेक्षित प्रशासकीय व राजकीय अनुभव आल्याने विस्कटलेली घडी बसवण्यासाठी महसूलमंत्री येत्या महिन्यात पुन्हा एकदा धाराशिव दौरा करणार आहेत.
‘ड्रग्ज स्पेशालिस्ट’ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना तपास अधिकारी नेमा – खासदार ओमराजे
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा ड्रग्ज सिंडीकेटचा चांगला अभ्यास झाल्याने, शिवाय कागदावर उत्तम ‘पीपीटी’ बनवण्याचा अंगीकृत ‘गुण’ असल्याने त्यांना सरकारने ‘मित्रा’च्या उपाध्यक्ष प्रमाणे ‘विशेष बाब’ म्हणुन ‘सहायक तपास अधिकारी’ म्हणुन नेमावे असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खोचक टीका केली आहे. आमदार कैलास पाटील यांच्या लक्षवेधीचे उत्तर लीक, शपथपत्र यासह तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा हस्तक्षेप वारंवार दिसून आला आहे, त्यामुळे त्यांनाच अधिकृत नेमा अशी उपरोधी टीका केली आहे.
सर्वसाधारणपणे पोलिसांना सर्व माहिती असते मात्र ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडे ठोस माहिती उपलब्ध नव्हती, मी योग्य व्यक्तीमार्फत माहिती दिल्यानेच हे उघड झाले असा दावा आमदारांनी केला होता. तुळजापूरात ड्रग्ज विक्री सुरु होते हे महिलांनी सांगितले, निवडणुकीनंतर मी माहिती दिली व पोलिसांनी कारवाई केली असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील स्वतः सांगतात. त्यांना अनेक बाबी माहिती असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी त्यांनी निवडणुका होईपर्यंत हे लपवून ठेवले त्यामुळे अनेक तरुणांना या काळात व्यसन लावले, आयुष्य बरबाद झाले. विधानसभा अधिवेशनात त्यांनी आवाज का उठवला नाही असा सवाल केला.