धाराशिव – समय सारथी
धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभाग जिजाऊ चौक ते भवानी चौक दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिम 12 ऑगस्ट व 13 ऑगस्ट असे 2 दिवस राबविणार आहे. नागरिकांना स्वतः अतिक्रमण काढण्यास मुदत देण्यात आली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.“शहर स्वच्छ, सुटसुटीत आणि वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश मोरे आणि कार्यकारी अभियंता शिवराम केत यांनी केले आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम राष्ट्रीय महामार्ग 68 वरील पाटस -दौड- धाराशिव-बोरफळ मार्गावरील जिजाऊ चौक ते भवानी चौक हा मार्ग नवीन प्रकल्पाच्या अंतर्गत 24 मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी आयोजित केली आहे. विशेषतः जिजाऊ चौक ते भवानी चौक (सांजा रोड) हा मार्ग मोकळा व सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधितांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून टाकावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
लक्षणीय म्हणजे, सुमारे 70 टक्के नागरिक आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन रस्ते सुरळीत होण्यास मदत होत आहे. यापूर्वीही मार्केट यार्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांनी अशाच प्रकारे स्वखुशीने सहकार्य केले होते.
प्रशासनाचा विश्वास आहे की, पुढील काळात शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण होऊन वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत व सुरक्षित होईल. विभागाने स्पष्ट केले आहे की, निश्चित मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ते प्रशासनामार्फत हटविण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल.