मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण – नगर विकास मंत्र्यांची केवळ एका मुद्याला स्थगिती
3 दिवसात अहवाल शासनास सादर करा – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या फौजदारी कारवाईच्या आदेशाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली असून याबाबतचे लेखी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत. नगर विकास विभागाचे कक्ष अधीक्षक रश्मीकांत इंगोले यांनी ५ ऑगस्ट रोजी हे आदेश काढले आहेत यात जिल्हाधिकारी यांनी सुनावणीसाठी वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल शासनास देण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार आगामी 3 दिवसात शासनाकडे पुराव्यासह अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नगर परिषद प्रशासनास दिले आहेत. मंकावती कुंडाच्याबाबत संशयास्पद बनावट कागदपत्रे ( पुरावे) तयार केल्या प्रकरणी देवानंद रोचकरीसह इतरांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या एका मुद्यास स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी मंकावती प्रकरणात ४ मुद्यावर वेगवेगळी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यातील केवळ फौजदारी गुन्हे नोंद करण्यास स्थगिती दिली आहे.
देवानंद रोचकरी यांनी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या संपूर्ण आदेशाला स्थगिती देत मंकावती येथे बांधकाम परवाना देण्याची मागणी मंत्र्यांकडे केली होती मात्र त्यातील केवळ एका मुद्याला स्थगिती दिल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मंत्र्यांनी संपूर्ण आदेशाला स्थगिती न दिल्याने इतर 3 मुद्यावर कारवाई करण्यास प्रशासनाचा मार्ग मोकळा असुन त्यादृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. फौजदारी कारवाई टाळण्यासाठी केलेली ही उठाठेव चांगलीच गाजली असून यामुळे अनेक कायदेशीर प्रश्न समोर आले आहेत. सामान्यतः दिवाणी प्रकरणातील निकाल किंवा आदेशात संबंधित खात्याचे मंत्री हस्तक्षेप करीत तात्पुरती स्थगिती देत सुनावणीची प्रक्रिया घेतात मात्र मंकावती स्थगिती प्रकरणात फौजदारी स्वरूपाच्या कारवाईस मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी यांनी एखाद्या प्रकरणात चौकशीअंती फौजदारी गुन्हा नोंद करण्याच्या शिफारशीला मंत्री स्थगिती देऊ शकतात का ? हा त्यांच्या अधिकार कक्षेत येतो का ? त्यांना फौजदारी शिफारशीत हस्तक्षेप करता येतो का ? हा प्रश्न चर्चिला जात असून यावर कायदेतज्ज्ञांची अनेक मतमतांतरे आहेत. या मुद्यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मंकावती कुंड प्रकरणी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या आदेशाला नगर विकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्यावर देवानंद रोचकरी समर्थकांनी ‘देवराज सरकार’ सह ‘हिंसा परमोधर्म’,’बाप म्हणतात तुळजापूरचा’ व मुळशी पॅटर्नचे डायलॉग असलेले विडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल केले होते त्यामुळे या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर एक प्रकारे खिल्ली उडवली होती.
मंकावती कुंड प्रकरणी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे,नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या लेखी अहवालानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा १९०४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व तुळजापूर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सदर जागी अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे चार मुद्दे आदेशित केले होते त्यातील केवळ तिसऱ्या म्हणजे रोचकरी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्यास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.
तुळजापूर येथील भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांनी या प्रकरणात नगर विकास मंत्र्यांकडे अपील करताना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता व म्हणणे न ऐकून घेता जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याचे म्हटले होते. मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा रोचकरी यांनी मंत्र्यांकडे केला आहे. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली आहे. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढी ची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे. तरी या विहिर जागेचे सुशोभीकरण व बांधकाम करण्यास बांधकाम परवाना द्यावा अशी मागणी रोचकरी यांनी मंत्र्याकडे केली आहे.