धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी व मटका गुन्ह्यातील आरोपी विनोद पिटू गंगणे यांच्या हस्ते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. ड्रग्ज तस्करी सोबतच गंगणे हे मटका/जुगार गुन्ह्यातील आरोपी असून ते फरार असताना त्यांची सुरु असलेली मटका बुकी पोलिसांनी छापा टाकून उघड केली होती.
तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकासासाठी 1 हजार 866 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल मंत्री बावनकुळे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी बावनकुळे यांनी नागरी सत्कार सोहळ्याचे उत्तम नियोजन केल्याबद्दल गंगणे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत स्तुती सुमने उधळली. गंगणे यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला असून ते जमिनावर आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास सुरु असून 10 आरोपी फरार आहेत, पोलिस अद्याप अंतिम निष्कर्षांपर्यंत आले नाहीत त्यातच हा प्रकार घडल्याने तपास यंत्रणावर दबाव येण्याची शक्यता आहे. हीच का संस्कृती ? मंत्र्यांनीच पाठबळ दिले तर पोलिस काय करणार ? असा सवाल यानंतर उपस्थितीत केला जात आहे. हा कार्यक्रम म्हणजे लोकांचा काय मूड आहे हे जाणून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीची ‘लिटमस टेस्ट’ असून राजकीय पुनर्वसन व उद्दातीकरण अशी टीका होत आहे.
बावनकुळे याच्यावर फुलांचा वर्षाव करीत जोरदार स्वागत करण्यात आले, यावेळी गंगणे यांना मंत्री बावनकुळे यांनी जवळ बोलवून घेत कौतुक केले. निधी दिल्याबद्दल सत्कार नको असे मी व आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणालो मात्र गंगणे यांनी भावना व्यक्त केली कि ज्यानी तुळजाभवानीला जागतिक स्तरावर नेहण्याचे कार्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केले, त्यांचा सत्कार झाला पाहिजे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात विनोद गंगणे हे सेवन गटातील आरोपी असून ते पोलिसांच्या दप्तरी खबरी आहेत, त्यांनी टीप दिल्यानंतर तस्करी रॅकेट उघड झाले होते. तर ड्रग्ज तस्करीबाबत 1 वर्षापासून माहिती होती, योग्य माहिती दिल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले होते. काही बाबी माहिती असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाठीशी घातल्याचा आरोप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर होत आहे.
ड्रग्ज गुन्ह्यातील 38 पैकी 28 आरोपीना अटक केली असून 10 आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपीना 15 ऑगस्टपूर्वी अटक करावे अशी डेडलाईन पालक मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलिसांना दिली आहे. पालकमंत्री सरनाईक यांचा देखील सत्कार ठेवला होता मात्र ते आले नाहीत, कदाचित हेच न येण्यामागे कारण असावे.