धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या गाई, जनावरे यांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असुन याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. धाराशिव शहरात एका ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या गाईवर तस्करी करण्याच्या उद्देशाने काही जन पाळत ठेवुन फिरत होते, लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांना अडविले, बराच गोंधळ उडाल्यावर त्याची माहिती ऍड दिनकर वायकर यांनी आंनद नगर पोलिसात दिली व गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली मात्र या प्रकरणावर सोयीस्कर पडदा टाकण्यात आला.
काही राजकीय मंडळींच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप ऍड वायकर यांनी केला आहे. संबंधित पकडलेली व्यक्ती ही गाय त्याचा दावा करीत होते मात्र त्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती, या बाबी असतानाही त्याला सोडण्यात आले. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा त्रास, अपघात होतो. शहरात मोकाट फिरणारी जनावरे नगर परिषदेने पकडून कोंडवाड्यात ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
धाराशिव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाई व इतर गोवंश जनावरे आणुन रस्त्यावर मोकाट सोडली जातात, ती जनावरे रस्त्यावरचे, भाजी पाला व मिळेल ते खाऊन मोठी होतात, या जनावरांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवले जाते. रात्री या जनावरांना एका ठिकाणी गोळा केले जाते. जनावरे मोठी झाली की त्यांची मासांसाठी कत्तल करण्याच्या उद्देशाने विक्री किंवा कत्तल केली जाते. जी मोठी जनावरे विकली किंवा कत्तल केली गेली त्याजागी लहान जनावरे त्या कळपात सोडली जातात, अश्या प्रकारे जनावरांची संख्या तितकीच ठेवली जाते, यासाठी एक मोठी टोळी कार्यरत आहे. शहरातील बाजार चौक, भीम नगर येथील मारुती मंदीर, रुग्णालय, गणेश नगर, अनेक मुख्य चौक यासह अनेक ठिकाणी रात्री मोकाट जनावरे मोठ्या संख्येने एकत्र असतात.