धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात डॉक्टर हिमांशु सत्यनारायण व्यास यांच्या मानेवर कोयता ठेवुन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असुन हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परप्रांतीय वाद व तिरस्काराच्या भावनेची या हल्ल्यामागे किनार असल्याची माहिती आहे, इतर राज्यातून इथे येऊन ते काम करीत आहेत यासह अन्य कारणे या हल्ल्यामागे आहेत. डॉक्टरचा पाठलाग करून पाळत ठेवत हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देशभरातून अनेक विद्यार्थी, डॉक्टर इथे शिक्षण व रुग्ण सेवेसाठी आले असुन त्यांच्या बाबतीत असे प्रकार अनेकदा घडत असल्याने असुरक्षित व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात पोलीस चौकी, सुरक्षा जवान असतानाही धमकावणे, पैशांची मागणी करणे, छेडछाड असे प्रकार घडत आहेत त्यावर उपाययोजनाची गरज आहे असे निवेदन पालक अमर राजेंद्र रहाटे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत रोनीकेत उर्फ स्वप्नील राऊत या आरोपीला अटक केली असुन त्याला कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर एक आरोपी फरार आहे. या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडीला कट का मारला म्हणुन हा हल्ला केल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस कारणांचा शोध घेत आहेत.
जीवे मारण्याचा प्रयत्न, डॉक्टर संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असे अनेक प्रकार वारंवार घडत असतात, शिकाऊ डॉक्टर, रुग्ण यांना धमकावले जाते. पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप ओव्हाळ हे तपास करीत आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 109, 121(1),132,352,351(2),शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.