धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. नीता अंधारे या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 1 ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार त्यांची बीड येथून धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे. त्या सोमवारी धाराशिव येथील पालिकेचा पदभार घेतील, अशी माहिती आहे.
धाराशिव नगर परिषदेत तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, वसुधा फड यांच्या काळात अनेक प्रकारचे गैरव्यव्हाराचे आरोप करण्यात आले. नगर परिषद फंडात अनेक कामे करून करोडो रुपयांची देणी थकीत आहेत, त्या कामाच्या दर्जासह अन्य बाबी आरोपाच्या पिंजऱ्यात आहेत. आमदार सुरेश धस यांच्या मागणीनुसार विशेष लेखा परीक्षण करण्यात येणार असुन एसआयटी चौकशी व कारवाईची टांगती तलवार आहे, त्यामुळे धस याचा कौल बाजुने असणे गरजेचे आहे.
धाराशिव नगर परिषदेत आर्थिक बोजवारा उडाला असुन नगर परिषद फंड 59 कोटी,विद्युत बील 5.5 कोटी, शहर स्वच्छता 19 कोटी, विविध शासकीय देणी 81 कोटी व सेवानिवृत्त कर्मचारी देणी 2.5 कोटी अशी जवळपास 140 कोटी देणे आहे, त्यातच पूर्वीच्या गैरव्यवहार व चौकशीचा ससेमीरा यात काम करून स्तिथी सुधारणे एक तारेवरची कसरत असणार आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता यासह अन्य बाबींचा बोजवारा उडाला आहे. त्यातच आगामी काही महिन्यात निवडणुकीच बार उडणार असुन राजकीय घमासान होणार आहे.