धाराशिव – समय सारथी
राज्यात डॉल्बी बंदी असली तरी त्याचा सगळीकडे सर्रास वापर केला जात आहे. अनेक महापुरुषांच्या जयंतीत डॉल्बीवर अश्लील गाणे लावुन ठेका धरला जात असतानाच धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत चक्क 4 ते 5 नृत्यांगना नाचवण्यात आल्या. बाउन्सर, डीजेचा टाळ, अश्लील हावभाव, कर्णकर्कश आवाज असे या नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
धाराशिव येथील ‘अप्पा साम्राज्य’ नावाच्या ग्रुपच्या वतीने आयोजित जयंती मिरवणुकीत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या जयंती मिरवणुकीला पोलिसांचा बंदोबस्त होता मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणुन कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. महापुरुषांच्या जयंतीत ‘नृत्यांगना’ या ‘नव्या संस्कृतीची’ ही धाराशिवमधील सुरुवातच म्हणावी लागेल. आता पोलीस काय भुमिका घेणार हे पाहावे लागेल. हा प्रकार पाहून महापुरुषांनो माफ करा असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. या प्रकाराला समाजातील अनेक घटक कारणीभुत आहेत.
डॉल्बीमुक्त उत्सव व मिरवणुका अशी संकल्पना अनेकांनी मांडली मात्र अपेक्षित यश आले नाही. पोलीस अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेतला मात्र सुरुवात कोणापासून, कोणत्या जयंती उत्सव पासुन करायची यावर कधीच एकमत झाले नाही आणि मग काय तर सगळ्यांना सरसकट सूट असा अलिखित नियम सुरु झाला.
कार्यकर्ते यांना खुश करायचे म्हणुन लाखो रुपयांच्या देणग्या, डॉल्बी खर्च राजकीय नेते करतात, त्यात निवडणुका आल्या की जंगी तयारी व मोठा खर्च… पोलिसांनी कारवाई केली तर मग दबाव, फोनाफोनी व राजकीय संरक्षण दिले जाते. तत्व, महापुरुषांचे विचार, कार्य, उद्देश असा व्यापक चर्चेचा कोणी विषय मांडला की जातीय रंग देऊन विषयातर केले जाते, काही नेत्यांच्या दुटप्पी भुमिकेने असे प्रकार वाढत आहेत.