कांबळे दीड वर्षांपासुन फरार – आता तरी अटक करणार का ?
धाराशिव – समय सारथी
फय्याज काझी या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात फरार आरोपी सुरेश कांबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळला असुन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुम येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आत्मसमर्पण आदेशाचे उल्लंघन केले, ते कायदेशीर पळ काढत आहेत. पोलिसांनी तातडीची पावले उचलून आरोपीचा शोध घ्यावा व अटक करुन कार्यवाही करावी असे निर्देश न्यायमुर्ती अद्वित सेठना यांच्या कोर्टाने दिले आहेत.
कांबळे हे जवळपास दीड वर्षांपासुन फरार असुन त्यांना शोधणे हे धाराशिव पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी अटक होणार की नाही हे पाहावे लागेल. भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सुरेश कांबळे यांच्यासह अन्य आरोपीवर 21 जुन 2023 रोजी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे ) 323, 504,506 आणि 34 याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 35 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कांबळे यांनी छळ, मारहाण केल्याचा आरोप आहे.
उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने प्राथमिक दृष्टीकोन स्पष्ट केला, त्यानंतर कांबळे यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्याची परवानगी मागितली मात्र सरकारी वकिलांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 8 डिसेंबर 2023 आणि 19 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या आदेशांचा विचार करता, अर्ज मागे घेण्यास परवानगी दिल्यास, हा अर्जदाराच्या गैरवर्तनास न्यायालयाकडून अप्रत्यक्ष मान्यता देण्यासारखे ठरेल. कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रती अनादर दाखवत हलगर्जीपणा दाखवला, अशा वर्तनाला न्यायालयाची मान्यता मिळणे योग्य ठरणार नाही असे कोर्टाने आदेशात म्हण्टले आहे.
कांबळे हे कायद्यापासुन पळ काढत आहेत, संबंधित पोलिस तपास यंत्रणा यांनी कायद्यानुसार सर्व आवश्यक आणि तातडीची पावले उचलावीत, जेणेकरून आरोपी हा कायद्यापासून पळ काढत राहू नये व त्याला न्यायालयासमोर आणता येईल. भूम पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास कायद्याप्रमाणे अटक करून पुढील कार्यवाही करावी, असे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनवणीपर्यंत तात्पुरता दिलासा मिळाल्यावर ना मंत्री,ना खासदार ना आमदार, नाम तो सुना ही होगा.. साम,दाम,दंड भेद… सिंघम,सरकार राज असे फिल्मी डायलॉग वापरत कांबळे यांची अनेक गावात मिरवणूक काढुन जेसीबीतुन फुले, गुलालाची उधळण करण्यात आली, फटाके फोडत जल्लोष करण्यात आला, त्याचे व्हिडिओ, रिल्स, फोटो स्वतः कांबळे यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट केले, एक प्रकारे इव्हेंट करीत शक्तीप्रदर्शन केले. हा सगळा प्रकार पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी कोर्टासमोर मांडला.
कांबळे यांनी भुम कोर्टात अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला होता त्यावेळी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी व सरकारी वकील ऍड किरण कोळपे यांनी बाजु मांडली. आत्महत्यापुर्वीची व्हिडिओ क्लिप, तपास, उपलब्ध पुरावे, गुन्ह्याचे स्वरूप, कांबळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मांडली त्यानंतर जामीन नाकारला, त्यानंतर कांबळे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. फय्याजच्या आईने पुरवणी जबाब देत सुरेश कांबळे यांच्यासह 2 आरोपींचा या घटनेशी संबंध नसल्याने त्यांची नावे आरोपी यादीतून वगळावी असे सांगितले. फय्याजचे वडिल व इतर साक्षीदार त्यांच्या जबाबावर ठाम आहेत. आरोपी हे स्थानिक असुन त्यांच्यापासुन जीविताला धोका आहे, माझा मुलगा आता परत येणार नाही त्यामुळे कोर्ट प्रकरण वाढवायचे नाही असे हतबल होत पोलिसांना सांगितले. या बाबी पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी केस डायरीत नमुद करीत कोर्टात मांडल्या, त्यामुळे कांबळे यांची ही खेळी अपयशी ठरली.
आत्महत्या केल्यावर माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती विडिओमध्ये करीत फय्याज यांनी आत्महत्या केली होती.