उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना तुळजापूर तालुका कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने रोचकरी बंधू यांची उस्मानाबाद जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 6 दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर रोचकरी बंधू यांची जेल वारी सुरू झाली आहे. रोचकरी यांना यापूर्वी कोर्टाने 1 वर्षाची शिक्षा दिल्याचे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे मत नोंदवत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून रोचकरी यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी व ते या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करीत नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने वाढीव पोलीस कोठडी दिली होती ती मंगळवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट रोजी अटक झाल्यावर त्यांना 19 ऑगस्ट रोजी कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
बनावट कागदपत्रे प्रकरणी रोचकरी यांना भूमी अभिलेख कार्यालयातील कोण कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली ? कट कसा रचला व त्यात सहभागी कोण? याचा तपास सुरू असुन ती नावे गुलदस्त्यातच आहेत.
रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.आरोपी हा शासकीय नौकराबद्दल राजकीय गुंडगिरीचे अधिकाराचा गैरवापर करून त्यांना ब्लॅकमेल करून त्याद्वारे गोरगरीब लोकांना फसवून त्यांचेकडून जमिनी व जागा भूखंड आपले नावे करून घेण्याच्या उद्देशाने त्यांची फसवणुक करण्याच्या सवयीचा आहे.त्या अनुषंगाने तो सर्व शासकीय कार्यालयात ये जा करून स्वतःच्या फायद्यासाठी विविध शासकीय कार्यालयाचे शिक्के बनविले असल्याची शक्यता आहे असे पोलिसांनी कोर्टात मत मांडले होते.
देवानंद रोचकरी यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली आजवर तब्बल 35 गुन्हे नोंद असुन त्यातील अनेक गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत असे पोलिसांनी कोर्टात अहवाल दिला आहे तसेच नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यलयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला होता , त्या प्रकरणात रोचकरी हे जामीनावर आहेत. रोचकरी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांनी कोर्टात मांडली आहे. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे गुन्हे पूर्वी नोंद आहेत.