एकाची आत्महत्या तर एकाचा मृत्यू – भुमी अभिलेख कार्यालयातील आरोपी कोण ?
वंशावळीत तफावत, सातवी पिढी असताना केवळ दोघांची वारसा हक्काने नोंद ?
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या जामीन अर्जावर आता 2 सप्टेंबर रोजी गुरुवारी होणार आहे.बनावट कागदपत्रे प्रकरणी रोचकरी यांना तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील कोण कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली ? कट कसा रचला व त्यात सहभागी कोण? याचा तपास सुरूच असुन ती नावे गुलदस्त्यातच आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही भूमी अभिलेख कार्यालय व पुरातत्व विभाग या प्रकरणात मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान रोचकरी यांनी कागदपत्रे सादर करताना वेगवेगळ्या वंशावळी वापरल्या असून नावात बरीच तफावत असल्याचा आरोप ऍड कदम यांनी केला आहे.
देवानंद रोचकरी यांनी नगर विकास मंत्र्यांकडे दिलेल्या लेखी म्हणणेनुसार या कुंडाची मालकी शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांची असून ही त्यांची सातवी पिढी आहे, असे असताना आजवरच्या अन्य वारसांची नोंद वारसाहक्काने न घेता थेट या दोघांची नोंद तुळजापूर भुमी अभिलेख कार्यालयाने घेतल्याने कुंड हडप करण्याचा हेतू स्पष्ट झाला असुन अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. तुळजापूर भुमी अभिलेख कार्यालयातील अनेक कागदपत्रात हेराफेरी झाली असून या कार्यालयातील तालुका भुमी अधीक्षक पंडीत डोईफोडे या अधिकाऱ्यांने कार्यालयातील सहकारी कर्मचारी यांची नावे लिहून आत्महत्या सुद्धा केली आहे तर रोचकरी प्रकरणातील एक संबंधीत महिला कर्मचारी गंभीर आजाराने मयत झाली आहे. एक मयत तर एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर मोठी अडचण झाली आहे. आत्महत्या व तिर्थकुंड हडप अशा दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध आहे का ? भूमी अभिलेख कार्यालयातील इतर आरोपी व वेगवेगळ्या वंशावळी यासह अन्य बाबींचा तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.दरम्यान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तुळजापूर येथील भुमी अभिलेख कार्यालयाची इतर यंत्रणा मार्फत सर्व कागदपत्रांची विशेष दप्तर तपासणी करण्याची मागणी तक्रारदार ऍड जनक कदम पाटील यांनी केली आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा १९०४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी असे आदेशीत असताना प्रशासकीय कार्यवाही अद्याप प्रलंबीत आहे.हे दोन्ही विभाग सुस्त आहेत.
तुळजापूर तालुका कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर रोचकरी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने रोचकरी बंधू यांची उस्मानाबाद जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट अटक झाल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते उस्मानाबाद जेलमध्ये आहेत
रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला आहे .
मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला होता. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढी ची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे असे म्हणटले होते.शेटीबा मंकावतीराव यांच्या नंतर अनेक वारस असताना अन्य वारसांना त्यांच्या हक्कापासून वगळून थेट देवानंद रोचकरी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप ऍड कदम यांनी केला.