शौचालयाचा वापर होतो का ? पाणंदमुक्तीसाठी कारवाईची मोहीम राबवा – खासदार ओमराजे
लोकप्रतिनिधीनी व्यक्त केली बैठकीत नाराजी, अनेक कामे अपुर्ण
उस्मानाबाद – समय सारथी
जलजीवन अभियानाला 2 वर्ष पूर्ण होत आली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात या अभियानाची गती कमी असल्याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली तर जिल्ह्यात शौचालय बांधले असले तरी त्याचा प्रत्यक्ष वापर होतो का ? अनेक जण आज उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे त्यामुळे पाणंदमुक्तीसाठी प्रशासनाने कारवाईची मोहीम राबवावी असे आदेश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत दिले तर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनाची कामे प्रभावीपणे होत नसल्याने आमदार कैलास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेण्यात आला यावेळी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्यासह जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.लोकप्रतिनिधीनी बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त केली व अनेक कामे अपुर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले.
गेली 2 वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यात जलजीवन मिशनची गती कमी आहे , हे दुर्दैवी आहे . 2024 पर्यंत प्रत्येक घरातील व्यक्तीला 55 लीटर प्रतिदिन पाणी देण्यात येणार असल्याचा संकल्प राज्यमंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडाचे विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत विरोधक त्यांची भूमिका मांडत असतात , मुख्यमंत्री सन्मानाने येतील व मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतील. मराठवाड्याचे विकासाचा शिल्लक अनुषेशबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रश्न मांडू ते पूर्ण करतील असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळली नाही , ती 2 टप्प्यात पूर्ण करणार येणार आहे. पहिल्या टप्प्यात पैठण , गंगापूर , वैजापूर तर दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात योजना राबविणार येणार आहे.
2012 च्या सर्वेक्षणनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 2 लाख 28 हजार 617 कुटुंबाकडे शौचालय असल्याचे या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले यावर खासदार ओमराजे यांनी याचा प्रत्यक्षात वापर होतो का हा प्रश्न उपस्थित केला. आजही अनेक जण उघड्यावर शौचास जात असल्याने साथीचे आजार होत आहेत त्यामुळे पाणंदमुक्तीसाठी कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी 1 कोटी 23 लाख खर्च करण्यात आले.2021 वर्षाच्या कृती आराखड्यात 50 लाख रुपये खर्च करून मॉडेल गोबरधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन 2 ऱ्या टप्यासाठी 63 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 557 शाळापैकी 1 हजार 510 म्हणजे 96.98 टक्के शाळेत तर 1 हजार 882 अंगणवाडी पैकी 1 हजार 650 अंगणवाडीत म्हणजे 87.67 टक्के नळ जोडणी दिली आहे.