धाराशिव – समय सारथी
गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागुन तडजोडीअंती 4 लाख लाख रुपये घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी अंमलदार मोबीन शेख यांच्यावर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना 1 दिवसांची पोलिस कोठडी दिली असुन आज कोर्टात हजर केले जाणार आहे. साहेबांना विचारून कमी जास्त करतो असे तपासात निष्पन्न झाले असुन तो साहेब कोन ? याच कोडं उलघडणे हे लाचलुचपत विभागासमोर एक आव्हान असणार आहे. लाचलुचपत विभागाकडे कोठडी दिल्यानंतर शेख यांना धाराशिव शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले, या काळात त्यांना काही जन भेटले असुन ‘त्या’ साहेबांचे नाव न घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या काळातील सीसीटीव्ही चेक करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
फिर्यादीने शेख यांना 3 लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे. 3 लाख दिले असतानाही पुन्हा 5 लाख मागितल्याचे फिर्यादीत म्हण्टले आहे. दरम्यान शेख यांचे निलंबन करण्यात आले आहे. साहेबांना बोलुन कमी जास्त करतो असे तपासात आले असुन ‘तो’ साहेब कोन याचा शोध घेणे असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले त्या आधारे पोलिस कोठडी देण्यात आली त्यामुळे ‘तो’ साहेब शोधणे हे लाचलुचपत विभागापुढे एक आव्हान असणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख कोर्टात बाजु मांडत आहेत.
धाराशिव तालुक्यातील गावसूद या गावात शेतजमिनीच्या बांधाच्या कारणावरून भांडण झाले होते, तक्रारीमध्ये फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या विरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचा तपास अंमलदार मोबीन शेख यांच्याकडे होता, या गुन्ह्यात 3 जणांना अटक करत नाही म्हणुन शेख यांनी 3 लाखांची मागणी केली होती, तक्रारदार व त्यांचा भाऊ हे शिक्षण घेत असल्याने नाईलाजास्ताव 8 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 वाजता 3 लाख रुपये दिल्याचा दावा फिर्यादीत केला आहे. 3 लाख दिल्यानंतरही पुन्हा 5 लाख मागण्यात आले. तक्रारदाराचा भाऊ व वडील हे भांडण दिवशी घटनास्थळी नव्हते तरी देखील गुन्हा नोंद करण्यात आला, तो पोलीस भरतीचा प्रयत्न करीत होता. गुन्ह्यातुन नाव कमी करण्यासाठी विश्वासातील साक्षीदार घेऊन ये म्हणुन 5 लाख मागितले. 5 लाख रुपये मागितल्यावर एकदाच काय तो तोडगा काढा व पैसे कमी करा असे फिर्यादीने सांगितले.
मी साहेबांना बोलतो, विचारून सांगतो असे अंमलदार यांनी सांगत 5 लाख सांगून 4 लाखावर तडजोड केली. कमी जास्त होते की नाही हे साहेबांना विचारून सांगतो असे आरोपी अंमलदार शेख म्हणल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर लाच मागणी पडताळणीचा पंचनामा करण्यात आला असुन त्यात साहेबांना बोलतो, विचारतो असे आले आहे त्यामुळे आता ‘तो’ साहेब कोन याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व्हॉइस रेकॉर्डिंग व इतर पुरावे आधारे करीत आहे. ‘ते’ नाव शोधून काढणे एक आव्हान असणार आहे.
शेख यांनी लाच मागितली मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी पैसे घेतले नाहीत त्यामुळे लाच मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास अधिकारी व लाच मागणी कारवाई अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहायक लाच मागणी पडताळणी अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक विजय वगरे यांनी काम पाहिले. लाच मागणी पडताळणी पथकात पो ना अशिष पाटील, विशाल डोके, सिध्देश्वर तावसकर होते. मार्गदर्शन अधिकारी श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र,पर्यवेक्षण अधिकारी योगेश वेळापुरे,पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी काम पाहिले.
लाचलुचपत विभाग त्या गुन्ह्याचा तपास करीत आहे. ते पैसे कोणाच्या निर्देशाने मागण्यात आले. यात कोणीही अधिकारी निष्पन्न झाला तरी कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धाराशिव पोलीस असे प्रकार सहन करणार नाही, कडक कारवाई केली जाईल. लाच मागणारे अंमलदार शेख यांचे निलंबन करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक खोखर यांनी सांगितले.