आमदार सुरेश धस यांच्या मागणीला यश, तपासाला गती येण्याची शक्यता
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर पालिकेअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथकाच्या कामकाजासाठी अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांना पर्यवेक्षण तथा नोडल अधिकारी नेमण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नोडल अधिकारी नेमल्याने या घोटाळ्याच्या तपासाला गती येणार आहे. विशेष तपास पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा समावेश आहे. हे तिन्ही अधिकारी अनुभवी असल्याने यात कारवाईची शक्यता आहे.
एसआयटी स्थापना होऊनही अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची चौकशी किवा कारवाई न झालेबाबत आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली होती. चौकशी व एसआयटीच्या कामकाजासाठी एक नोडल ऑफिसर नियुक्त करावी अशी मागणी केली होती त्याला यश आले आहे, प्रत्यक्ष काम कधी सुरु होते हे पाहावे लागेल.
आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की, धाराशिव नगर परिषदेअंतर्गत झलेल्या 27 कोटीच्या घोटाळ्यांसंदर्भात विधानपरिषद प्रश्न क्र 21682 नुसार प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने सभागृहात चर्चा देखील करण्यात आली होती. सदरील मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. मी जाहीर पणे सभागृहात तत्कालीन पोलिस निरीक्षक व मुख्याधिकारी यांनी संगनमताने हा गुन्हा दाखल केला आहे असे भाष्य केले होते. त्या संदर्भात कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही ही गंभीर बाब आहे.
सभागृहात चर्चेदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री (गृह) व सध्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासन दिल्याप्रमाणे शासनाने 7 जुन 2024 रोजी एसआयटी स्थापन केलेली आहे तरी अद्यापपर्यंत त्याचा अहवाल किवा त्याची चौकशीचा प्रगती अहवाल सुद्धा मला किवा सभागृहाला सादर नाही ही बाब खेदाची आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक यांना कळवून तात्काळ एक नोडल ऑफिसर नेमून सदरील 27 कोटीच्या घोटाळयाची कसून चौकशी करण्यात यावी व तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली होती.