धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने 25 लाख रुपये लंपास करण्यासाठी स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचला असल्याचा प्रकार उघड झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपी कैलास घाटे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून संपूर्ण 25 लाख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही घटना ईटकळ टोलनाक्यानंतर सोलापूर महामार्गावर घडली, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली.
बँकेतील रोकड घेऊन सोलापूरकडे निघालेल्या कैलास घाटे याच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून डोळ्यात चटणी टाकून 25 लाखांची रोकड लुटल्याचा बनाव त्याने केला होता. घटनेनंतर त्यास नळदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि त्यांच्या तीन पथकांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी भेट, सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक माहिती आणि आरोपीची देहबोली पाहून पोलिसांना शंका आली. सखोल चौकशीत आरोपीवर मोठे कर्ज असल्याचे, तसेच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे उघड झाले. घाटे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानेच लुटीचा बनाव करून रक्कम लपवून ठेवली होती. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण 25 लाखांची रक्कम हस्तगत केली.
या कारवाईत पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे, आनंद कांगणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हावलदार जावेद काझी, शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, विनोद जानराव, नितीन जाधवर, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर,बळीराम शिंदे, पोलीस नाईक- अशोक ढगारे, बबन जाधवर, चालक पोलीस हावलदार- विजय घुगे, सुभाष चौरे, महेबबु अरब, पोलीस अंमलदार- डोगंरे, भोसले, दहीहांडे यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. एकंदरीत, पोलिसांच्या तात्काळ आणि काटेकोर तपासामुळे एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.