उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने भक्ताविना साजरा होणार होणार असून नवरात्र काळात उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे.नवरात्र काळात भक्तांना प्रवेश नसला तरी देवीच्या सर्व धार्मिक विधी अलंकार पूजा या विधीवत होणार आहेत.
तुळजाभवानी मंदिरात केवळ 50 जणांना धार्मिक विधीसाठी मिळणार प्रवेश असुन लसीकरण केलेलं असेल तरच त्या पुजाऱ्याना प्रवेश मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक व पुजारी मंडळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवरात्र उत्सवात देवीचे महंत,सेवेकरी,पुजारी व इतर मानकरी यांनाच प्रवेश मिळणार आहे. कोविडच्या नियमानुसार तुळजाभवानी देवीच्या सर्व पूजा , अलंकार व विधी होणार आहेत. नवरात्र काळात भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रवेश बंदी असणार तसेच तुळजापूर शहराच्या सर्व प्रवेशावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. नवरात्र काळात अनेक भाविक मशाल घेऊन व पायी चालत दर्शनासाठी येतात मात्र त्यांना प्रवेश बंदी असणार आहे त्यामुळे भाविकांनी तुळजापूर शहरात येऊ नये व ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी केले आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कॉवत ,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, प्रशासन अधिकारी इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके उपस्थित होते
महाराष्टाची कुलस्वामिनी व साडे तीन शक्तीपीठपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार असून यंदा कोरोना संकट असल्याने मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्याने भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे. मंचकी निद्रेनंतर 7 ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना करण्यात येणार आहे, हा उत्सव 21 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी पूजा परंपरेनुसार साजरे केले जाणार आहेत.29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत त्यानुसार नगर परिषद प्रशासन शहरात स्वच्छता , बॅरिगेटिंग व कोरोना अनुषंगाने फवारणी करनार असल्याची माहिती नगराध्यक्ष सचीन रोचकरी यांनी दिली. नवरात्र काळात पुजारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरविले असुन मानकरी व पुजारी हे नवरात्र काळात विधी पार पाडतील अशी माहिती पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी दिली.
शारदीय नवरात्र महोत्सवास २९ सप्टेंबर रोजी मंचीकी निद्राने सुरुवात होणार आहे या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.७ ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकासाठी बंद केल्या जाणार आहेत. 8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा,14 ऑक्टोंबर रोजी घटोत्थापन व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.