आशीर्वाद कोणाचा ? फौजदारी कारवाई होणार का ? सीसीटीव्ही असताना श्रद्धेचा बाजार सुरू
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील मुख्य जिजाऊ महाद्वारसमोर प्रति तुळजाभवानी मुर्ती स्थापन करून भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजाभवानी मंदीर समोरील गेटवर खुलेआम भविकाकडून पैसे गोळा करण्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोरोनाचे संकट असल्याने तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने भावीक महाद्वारवर माथा टेकून तुळजाभवानी दर्शन घेत आहेत याचाच फायदा काही पूजारी घेत असुन त्यांनी लूट सुरू केली आहे.
जिजाऊ महाद्वार या ठिकाणी काही पुजाऱ्यानी तुळजाभवानी मातेची प्रति मूर्ती व फोटो ठेवून भाविकांनी अर्पण केलेले पैसे लुटण्याचा धंदा सुरू केला होता , मुळात भाविकांनी अर्पण केलेले हे पैसे तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पेटी म्हणजेच दानपेटीत जमा व्ह्याला हवे होते मात्र मंदिर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन काही पुजाऱ्यानी देवीचा फोटो व त्यासमोर दानपेटीच ठेवत पैसे गोळा केले जात होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार राजरोस सुरू असुन मुख्यद्वार समोर हा धंदा कोणाच्या आशीर्वादने सुरू होता याची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक निवा जैन, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त अधिकारी उपस्थित होते व त्यांची बैठक सुरू असताना हा लुटीचा धंदा सुरू होता.तुळजाभवानी मंदिर संस्थानची बैठक सुरू असतानाही भक्तांची लूट सुरू होती याप्रकार नंतर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार योगिता कोल्हे,सौदागर तांदळे, इंतुले यांनी कारवाई सुरू केली.
तुळजाभवानी मंदिर समोर 24 तास मंदीर प्रशासन व पोलीस विभागाचा स्वतंत्र बंदोबस्त असताना देखील याकडे कानाडोळा केला जात होता. या प्रकारानंतर संबंधीत पुजारी कोण होते ? सुरक्षा रक्षक कोण होते व त्यांनी याकडे कानाडोळा का केला याबाबत नोटीस व चौकशी करण्याचे आदेश मंदिर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी तहसीलदार योगीता कोल्हे यांना दिले असुन त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज मागीविले आहे.
आशीर्वाद कोणाचा ? फौजदारी कारवाई व चौकशी होणार का ?
तुळजाभवानी देवीच्या पुरातन शिवकालीन 72 नाण्यावर डल्ला मारल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांची पोलीस कोठडी सुरू आहे. देवीचे मंदिर बंद असताना प्रतिमूर्ती ठेवून भाविकांनी दान केलेली रक्कम लुटणाऱ्या संबंधित पुजारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाई करून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व पोलीस अधीक्षक निवा जैन चौकशी करणार का ? व तुळजापूर येथील बिघडलेली यंत्रणा सुधारणार का ? हे पाहावे लागेल. प्राप्त माहिती नुसार जिजाऊ महाद्वार समोर काही पुजारी गेली अनेक दिवस पासुन हे लुटीचे काम करीत होते यात दररोज हजारो रुपये जमा केले जात होते.
कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन , मास्क सोशल डिस्टन्सचे तीन तेरा – कारवाई करणार , पोलीस अधीक्षक जैन
तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन होत असुन मास्क , शोशल डिस्टन्सचे तीनतेरा झाले आहे, असे असले तरी मंदिर प्रशासन, नगर परिषद व पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. शारदीय नवरात्र महोत्सवास २९ सप्टेंबर रोजी मंचीकी निद्राने सुरुवात होणार आहे या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.७ ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. हा उत्सव 21 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी पूजा परंपरेनुसार साजरे केले जाणार आहेत.29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत या काळात तुळजापूर प्रवेश बंदी असणार आहे. आगामी काळात तुळजापूरसह जिल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी सांगितले.