नवरात्रात दररोज लाखोंची गर्दी, भाविकात उत्साह – अनेक अधिकारी नवीन
मंदिर उघडण्याचा निर्णय मात्र कमी वेळेत नियोजन करणार कसे ?
कोरोनाचे सावट तर स्वच्छतेसह आरोग्याची काळजीला प्राधान्य,
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा साडे तीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, घटस्थापना पूर्वी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर घटस्थापना ही 7 ऑक्टोबर रोजी विधीवत पुजा करून होणार आहे. नवरात्रच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदीरे सुरू होणार असल्याने भविकात उत्साह असून पहिल्याच दिवशी लाखोंच्या गर्दीचा अंदाज आहे त्यामुळे मोठ्या नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याची गरज आहे. राज्य सरकारने मंदीरे खुली करण्याचा निर्णय घेतला असुन तयारीसाठी अवघा 9 दिवसांचा कालावधी राहिला आहे त्यामुळे नियोजनाची मोठी तारेवरची कसरत होणार आहे त्यातच तुळजापूर नगर परिषदेचे 2019 चे जवळपास 3 कोटी रुपयांचे यात्रा अनुदान थकीत असल्याने यावर्षी यात्रा नियोजन करताना आर्थिकसह अन्य अडचणी आहेत. तुळजापूर नगर परिषदेची अनेक कामे प्रलंबीत आहेत. मंदिर उघडण्याचा निर्णय मात्र कमी वेळेत विना आर्थिक निधी नियोजन करणार कसे ? हा प्रश्न नगर परिषदेसह अन्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. एकीकडे उत्सवावर कोरोनाचे सावट आहे तर या काळात स्वच्छतेसह आरोग्याच्या काळजीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुळजापूर शहरातील सीसीटीव्ही बंद असून स्वच्छतेची कामे प्रलंबीत आहेत.
तुळजाभवानी नवरात्र उत्सव काळात अनेक बाबींची जबाबदारी ही तुळजापूर नगर परिषदेची असते यात शहरात पार्किंग व त्याठिकाणी मंडप व्यवस्था, स्टेज, बॅरिगेटिंग,आलेल्या भक्तांना शौचालय, शहरात नियमित जंतुनाशक फवारणी, पिण्याच्या पाण्याचे पाणपोई, जनजागृती व्यवस्थासह आलेल्या भक्तासाठी ठिकठिकाणी तात्पुरते आरोग्य केंद्र व त्यासाठी औषध पुरविणे ही कामे दरवर्षी नगर परिषद करते यासाठी प्रशासकीय मान्यतेची वेळघालू प्रक्रिया आहे ज्याला किमान 1 महिना लागतो त्यातच 2019 चे 3 कोटींचे थकीत यात्रा अनुदानाचे पैसे न मिळाल्याने ठेकेदार यांची मनधरणी करावी लागणार आहे. सध्या तुळजापूर नगर परिषदेची आर्थिक स्तिथी बिकट असून स्वच्छता कर्मचारी यांच्या गेल्या 3 महिनीपासुन पगार नाहीत तर प्राधिकरण अभियंता यांच्या 4 महिन्यापासून पगार नाहीत. यात्रा नियोजन व विविध कामांना मंजुरी देण्याच्या नुषंगाने 27 सप्टेंबरला तुळजापूर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा दुपारी 2 वाजता आहे.
मंदीरे सुरू करण्याच्या निर्णय पूर्वी यात्रा नियोजन करण्यासाठी वेळ देणे गरजेचे होते मात्र तो दिला गेला नाही, त्यातच आर्थिक तरतूद किंवा यात्रा पूर्व अनुदान रक्कम दिली नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ या सर्व बाबींचा विचार करून आर्थिक मदत करावी जेणेकरून यात्रा सुरळीत पार पडेल. यात्रासाठी ठरलेल्या बाबी व्यतिरिक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अतिरिक्त खर्च होणार आहे त्यामुळे वाढीव अनुदान द्यावे अशी मागणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केली आहे.
नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सोमवारी तुळजापूर येथे नियोजनासाठी मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केले गेलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्यासह अन्य पोलीस अधीकारी नवीन रुजू झाले असून त्यांच्यासाठी हा पहिला नवरात्र आहे, नवरात्रमध्ये भक्तांचा जनसागर असतो त्यामुळे काटेकोरपणे नियोजन होणे गरजेचे आहे.