अटक – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना पुण्यातुन अटक, धाराशिव पोलिसांची कारवाई तर इतरांचा शोध सुरु
धाराशिव – समय सारथी
शासकीय निधीचा अपहार करुन 21 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह 3 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यात यलगट्टे यांना पुणे येथून अटक केली असल्याची माहिती आहे. गुन्हा नोंद होताना गोपनीयता पाळून धाराशिव पोलिसांनी मोठ्या शिताफिने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
यलगट्टे हे त्याच्या पुण्यातील राहत्या घरी होते त्यावेळी पोलिस आल्याची चाहूल लागताच ते शौचालयात लपून बसले मात्र त्यांना पोलिसांनी अटक केली अशी माहिती आहे.पोलिस निरीक्षक कानगुडे, कॉन्स्टेबल बी व्ही पतंगे, एम एम माने, के.एस.मोहिते, ए.एस.मनगीरे,पोलिस नाईक एस आर देवकर येरवडा पोलिस यांनी ही कारवाई केली. आरोपी असलेले तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत पवार यांचा शोध सुरु आहे.
भाजपचे विधानपरिषदेतील आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेच्या निधीत अपहार केल्याची व यलगट्टे यांच्या काळात झालेल्या विविध योजना याचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली होती त्यावरून जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा दैनिक समय सारथी वृत्तपत्राने याचा वारंवार पाठपुरावा केला होता.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. तो निधी त्या योजनेत जमा न करता रमाई आवास योजनेच्या खात्यात जमा केला त्यात 2 कोटी 93 लाख रुपये जमा केले व उर्वरित 21 लाख 64 हजार रकमेचा अपहार केला. तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण जनार्धन यलगट्टे, लेखापाल सुरज संपत बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत विक्रम पवार यांनी ही रक्कम अपहरीत केल्याचे चौकशी समितीत नमूद केले आहे त्यानुसार संगमत करुन रक्कम योजना बाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नगर परिषदेचे लेखापाल अशोक फरताडे यांना मुख्याधिकारी यांनी प्राधिकृत केले होते त्यानुसार दाखल केलेल्या फिर्यादीवरून आनंद नगर पोलिस ठाण्यात कलम 409, 420, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे करीत आहेत.
पदोन्नती घोटाळा सभागृहात चर्चेत – नियमबाह्य
नुकतेच आमदार धस यांच्या तक्रारीवरून यलगट्टे यांचे वर्ग गट अ संवर्गातून गट ब वर्गात डिमोशन म्हणजेच पदावनत करण्यात आले होते. त्या झटक्यानंतर आता हा गुन्हा नोंद होऊन दुसरा झटका बसला आहे. शासनाला प्रमोशन देताना खोटी माहिती देण्यात आली तसेच लाभ घेतल्याने या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना देण्यात आलेले वेतन, भत्ते याची वसुली नियमानुसार करावे तसेच यलगट्टे यांच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाद्वारे चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पत्राद्वारे केली आहे.
अनेक घोटाळ्यांनी सलग 2 अधिवेशन गाजलेल्या यलगट्टे यांचा उल्लेख प्रश्न उत्तराच्या चर्चेवेळी खुद्द विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केला होता. यलगट्टे यांच्यासह अन्य मुख्याधिकारी यांना नियमबाह्य रित्या प्रमोशन दिले गेल्याचा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत उपस्थितीत केला होता. यलगट्टे यांच्यासह मुख्याधिकारी रवी पवार, त्रिंबक डेंगळे पाटील, अजय चारठाणकर,यशवंत डांगे, वसुधा फड यांसह अन्य मुख्याधिकारी यांचे प्रमोशन नियमबाह्य झाले असल्याचा धस यांचा सभागृहात आरोप आहे त्यामुळे आता उर्वरित लोकांवर काय कारवाई होते ते पहावे लागेल. गंभीर गुन्हे, विभागीय चौकशी सुरु असताना त्याची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्यात आली नाही, त्यात संगनमत केले, प्रमोशनवेळी माहिती दडवली गेली असे गंभीर प्रकार आहेत यात कार्यवाही होणार आहे.
संबंधीत बातमी link –
https://www.samaysarathi.com/2023/08/2-21.html?m=1
21 लाखांचा घोटाळा – आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांची चौकशी व कारवाई
अनेक जण रडारवर – बायोमायनींग, गुंठेवारी याच्यासह अन्य चौकशी सुरु तर करोडोंच्या संचिका गायब