उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर , 459 जणांना वाचवले तर शेतीचे नुकसान
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी , भरीव मदतीची गरज – अधिकारी व लोकप्रतिनिधी बांधावर
उस्मानाबाद , समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर केला असून शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी बांधावर उतरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना
सुरक्षितस्थळी हलविण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असून एनडीआरएफ टीमकडून 16 जणांचे बचाव कार्य यशस्वी झाले. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले असून ग्रामीण रुगणालायसह गावात पाणी झाल्याने लोकांचे नुकसान झाले आहे. तेर गावात तेरणा धरणाचे पाणी आल्याने गावात 2 3 फूट पाणी साचले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे तेरणा नदीला महापूर आला असून तेर येथील ग्रामीण रुग्णालय हे पाण्यात गेले असून रुग्ण यांना बाहेर काढले आहे, तेर या गावात पाणीच पाणी झाले असून लोक वैतागले आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे , तेर ढोकी कळंब या भागात ढगफुटी झाली आहे.शेतात 4 ते 5 फूटपाणी असून सरकारने पंचनामे न करता थेट मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथीलअंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी 66.3,पाडोळी 81, केशेगाव 71, ढोकी139.5, जागजी123.8 तर तेर मंडळात 127.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा 65.5, इटकळ 83.3, कळंब तालुक्यातील मोहा 66.3,शिराढोण 171, गोविंदपूर-107.5 तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात 69 मिलीमीटर पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात या अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड झाली आहे. मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे 15 लाख 87 हजार 805 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेला आहे .औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 46 हजार 712,जालना जिल्ह्यात 2 लाख 38 हजार 872 ,परभणी जिल्ह्यात 1 लाख 75 हजार 511,हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 883,नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख 86 हजार 48,बीड जिल्ह्यामध्ये 54 हजार 421,लातूर जिल्ह्यात 6 हजार 122 उस्मानाबाद जिल्ह्यात 3 हजार 491 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यलयात करण्यात आली आहे.
अफाट नुकसान, भरीव मदतीची गरज – डॉ पदमसिंह पाटील
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांनी केली आहे. सरकारने पंचनामा करण्यासाठी वेळ न घालवता मदत करावी असे ते म्हणाले. पावसाने अफाट नुकसान झाले असून याची भरपाई होणार नाही, सरकारकडुन भरीव मदतीची गरज असुन ती करावी अशी मागणी माजी मंत्री डॉ पदमसिंह पाटील यांनी केली.
भरीव मदत देण्याचे मुख्यमंत्री यांचे आश्वासन – खासदार ओमराजे
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान केले असून याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे ते स्तिथीचा दर तासाला आढावा घेत असून पहिल्यांदा लोकांचे जीव वाचवा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सरकार भरीव मदत करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली.
सरसकट मदत द्या, भेदभाव नको – आमदार राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद येथे मोठ्या प्रमानात पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामे करण्याऐवजी शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत करताना पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे भरीव मदत दिली तोच निकष लावावा, भेदभाव करू नये. हेक्टरी 45 हजार रुपये तात्काळ द्यावे अशी मागणी केली आहे., कोरडवाहू पिकांना सरसकट हेक्टरी ₹ २५,०००/- तर बागायती व फळपिकांना हेक्टरी ₹ ५०,०००/- मदत (पीक विम्या व्यतिरिक्त) १५ दिवसाच्या आत देण्यात यावी.
करोडो रुपयांचे नुकसान, शेतकऱ्यांनो खचू नका – आमदार कैलास पाटील
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उडीद व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला आहे. पावसाने पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना भरीव मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असुन शेतकऱ्यांनो खचू नका, धीर धरा आम्ही तुमच्या तुमच्या पाठीशी आहोत असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले
धरण व नदीकाठी गावांना इशारा , काळजी घ्या – जिल्हाधिकारी दिवेगावकर
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून कळंब व उस्मानाबाद तालुक्यात काही भागात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे त्यामुळे मांजरा व तेरणा धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. लोकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. तेर ग्रामीण रुग्णालयात कळंब वाकडेवाडी व सौंदना या गावात अडकलेल्याना बाहेर काढले आहे , पुल व धरण ओढे इतर भागात नागरिकांनी फिरू नये असा सूचना पोलिसांना दिल्या आहेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
सेल्फी ठरू शकतो धोकादायक व जीवघेणा , तेरणा धरणाचा रस्ता खचला
उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून तेरणा मांजरा धरण फुल्ल झाले असून अनेक गावांत पुलावरून पाणी वाहत आहे, तेरणा धरण भागात पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे व लोक पाण्यात बिनधास्त उतरत फोटो काढत आहेत. तेरणा धरण भाग हा सेल्फी पॉईंट बनला असून लोक मोठ्या हौसेने सेल्फी काढण्यासाठी येत आहेत मात्र हा सेल्फी जीवघेणा ठरू शकतो याचे भान लोकांना दिसत नाही, तेरणा धरणकडे जाणारा जाणारा पूल व रस्ता खचला असून तो धोकादायक बनला तरी लोक जात आहेत. प्रशासन नदीकाठी व पाण्यात जाऊ नका असे आवाहन करीत असले तरी लोक जत्रा असल्यासारखे जमा होते आहेत.