सोयाबीन पिकांची काढणी सुरू – शेतकरी हवालदिल , बाजारात कवडीमोल भाव – कर्माने दिले पावसाने नेले
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानमुळे शेतकरी हवालदिल झाला असून आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे व पीक खराब होत आहे तर पंचनामे सुरूच आहेत, 2 दिवस उन्ह पडल्याने शेतकऱ्यांनी नुकसान झालेले सोयाबीन भरडणी करण्यास सुरुवात केली असून ते रस्त्यावर वाळवण्यास ठेवले आहे. पेरणी करण्यासाठी एकरी हजारो रुपये गेले व पाण्यात असलेले पीक काढायला मजूर 5 अधिकचे पैसे मागत आहेत. शेतकऱ्यांची चारही बाजूने कोंडी होते आहे.पिके गेले, पैसे मिळेना आहे त्या पिकाला मात्र बाजारात अडीच हजाराच्यावर भाव मिळत नाही.अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्याने पंचनामे होत नाहीत, कवडीमोल भाव मिळत असल्याने जगण्यात काहीच नाही असे सांगत शेतकरी निराशेच्या गर्तेत आहे, कर्माने दिले पावसाने नेले अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहे, सरकारने कागदीघोडे न नाचवीता तात्काळ मदत करावी अशी मागणी करीत आहे. एकीकडे शेतकरी संकटात असून अजून मदत मिळाली नाही तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे पाहणी दौरे आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री मदत जाहीर करतील – मंत्री अमित देशमुख
महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होईल व त्यात काय स्वरूपात व कशी मदत करायची याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील. आकडेवारी जमा करणे सुरू आहे, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे व त्याला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे असे मंत्री अमित देशमुख म्हणाले.शासन लवकरात लवकर पंचनामे करत असुन लवकरच पिक विमा व शासकीय भरीव मदत करेल , शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे उस्मानाबाद येथे पाहणी दौऱ्या दरम्यान म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , आमदार कैलास पाटील,जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात 278 कोटी नुकसानीचा प्राथमिक अहवाल
उस्मानाबाद जिल्ह्यात 27 व 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसुल विभागाने तयार करून सरकारकडे पाठविला आहे.अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे.या अतिवृष्टीचा फटका 2 लाख 88 हजार 137 शेतकऱ्यांना बसला असुन 2 लाख 66 हेक्टर इतक्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 146 कोटी 35 लाख 46 हजार 200 रुपये इतका निधी अपेक्षित आहे. पुरामुळे अनेक गावातील रस्ते महामार्ग खराब झाले असून 134 किलोमीटर मार्गाचे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी 51 कोटी 71 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. पुराने इतके रौद्ररूप धारण केले होते की त्यात 109 पुलांचे मोठे नुकसान झाले त्यातील अनेक पूल खचले तट काही पुल वाहून गेले त्यांच्या दुरुस्तीसाठी 38 कोटी 76 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. पावसाने व पुराने नदी काठच्या घरासह इतर घराची मोठी पडझड झाली, 1 हजार 87 घरांची पडझड झाली असून त्यांना 65 लाख 22 हजार मदत करने गरजेचे आहे