तुळजापूर येथील विकास निधी व शिवाजी महाराज पुतळा उदघाटनावरून वातावरण तापले, महाविकास आघाडीचा हल्लाबोल
सवाल – तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना ? केवळ श्रेयवाद – पुजारी व्यापारीसाठी काय केले ?
तुळजापूर – समय सारथी ( कुमार नाईकवाडी )
तुळजापूर येथील विकास निधी व त्यांच्या उद्घाटन आणि श्रेयवादाच्या मुद्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उदघाटनावरून वातावरण तापले असून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार व नगराध्यक्षावर हल्लाबोल केला. निधी एकाने आणायचा व दुसऱ्याने श्रेय घेण्यासाठी कोणालाही न सांगता गुपचूप उदघाटन करायचे हा कुठला प्रकार असा सवाल उपस्थित करीत तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना काही प्रश्न केले आहेत. तुळजापूर शहर, मंदिर विकासासह पुजारी,भाविक व व्यापारी यांच्या हितासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त असलेल्या आमदार व नगराध्यक्ष यांनी बैठकीत काय भुमिका मांडली याचा लेखाजोखा जनतेच्या दरबारात मांडावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चोपदार, सचिन कदम, संदीप गंगणे,शरद जगदाळे गोरख पवार,नितीन रोचकरी, काँग्रेसचे नगरसेवक सुनील रोचकरी,रणजीत इंगळे,लखन पेंदे,अनंत कोंडो, पिंटू अणदुरकर,सुदर्शन वाघमारे,शिवसेनेचे श्याम पवार,सुधीर कदम,सागर इंगळे,शेकापचे उत्तम अमृतराव, राहुल खपले,श्रेयस कुतवळ,राकाँचे दुर्गेश सांळुके,रोहीत चव्हाण,करण सांळुके,तौफीक शेख,महेश चोपदार आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमर परमेश्वर हेही उपस्थित होते त्यामुळे महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय नेत्यांनी भाजपच्या कार्यपद्धती विरोधात मोर्चा उघडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणाच्या सांगण्यावरून अचानक नियोजित ठिकाणी उभा केला? ठराविक लोकांकडून भूमीपूजन सोहळा व पुतळा बसवण्याचे कारण काय? पुतळ्यासाठी अनेक आंदोलने केली तरी 2 वर्ष का लागले? खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन 77 लाखांचा वाढीव निविदा मान्यता व निधी दिला तरी बांधकाम भूमिपूजन उदघाटन आमदार पाटील यांच्या हस्ते का झाले ? कोणत्याही पद्धतीचा प्रशासकीय व राजकीय शिष्टाचार का पाळला नाही ? तुळजापूर शहर विकासासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कुठलेही राजकारण न करता 7.5 कोटींचा निधी दिला. निधी एकाचा व उदघाटन एकाच्या हातून , राजकारण कोण करतंय सत्ताधारी का विरोधक ? असा सवाल केला आहे. तुळजापूर विकास प्राधिकरणसाठी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पाठपुरावा करून माजी मुख्यमंत्री कै विलासराव देशमुख यांच्याकडून 320 कोटींचा शहर विकासाठी निधी दिला परंतु शहरातील विकास कामाचा बोजावरा उडविला. शहरातील ड्रेनेज लाईनचे काम खराब पद्धतीने केल्यामुळे ड्रेनेज लाईनचे तिन तेरा नऊ अठरा केले. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया कामाबाबतीत आपलीच मर्जी असलेल्याना प्राधान्य दिला. नगर परिषदमधील सत्ताधाऱ्यांचा फक्त यात्रा अनुदानावर डोळा ठेवून मलिदा लाटायचा हा हेतु आहे ? नगर परिषदमध्ये पाणी पुरवठा अभियंता नाही,संगणक अभियंता नाही तसेच नगर रचनाकार अभियंता नाही यामुळे नगर परिषदमध्ये सताधाऱ्यांचा बोलबाला चालु आहे.
तुळजाभवानी मंदिर विश्वस्त असलेले आमदार व नगराध्यक्ष यांनी मंदिराचे नियोजनमध्ये आपली काय भूमिका आहे? विश्वस्त म्हणून बैठकीत काय भूमिका मांडली.तिन्ही पूजारी मंडळाचे आपण काय नियोजन केले ते सांगावे.पुजारी सेवेधारी व स्थानिक लोकांच्या चरण तीर्थ, अभिषेक व प्रक्षाळ पुजेसाठी काय नियोजन केले व याबाबत काय भूमिका मांडली?पूजारी, सेवेकरी, स्थानिक लोकांसाठी मंदिर प्रवेशाचे नियोजन काय केले व भुमिका काय मांडली हे सांगावे? लोकांसह अनेकांना हे प्रश्न पडलेले असुन आमदार व नगराध्यक्ष यांनी लोकांच्या हिताचे काय निर्णय घेतले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा अशी मागणी केली.