देशी दारूचा कारखाना उघड – 1 कोटींची देशी दारू जप्त तर 12 जणांना अटक
पुन्हा सक्रीय – नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची कारवाई
नाशिक – समय सारथी
नाशिक ग्रामीण पोलिसांनी साईखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांदोरी येथे देशी दारूचा कारखाना उघड केला असून त्यात 1 कोटींची देशी दारू जप्त करीत 12 जणांना अटक केली आहे.नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वतः कारवाई करीत अवैध देशी दारूचे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईने दारू माफियात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर यात सहभागी मोहरक्या व इतर लोकांची नावे समोर येणार आहेत. पाटील यांची बदली रद्द झाल्यानंतर ही त्यांची पहिली मोठी कारवाई असुन ते पुन्हा एकदा माफिया विरोधात सक्रिय झाले आहेत.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीत सहभागी असलेल्या अनेक मद्यसम्राटांवर कारवाई करीत त्यांचे जाळे मोडकळीस आणले आहे तर इगतपुरी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा भांडाफोड करीत मराठी बिग बॉस अभिनेत्री हिना पांचाळ सह टीव्ही सिरियल्स, बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेमाशी संबंधित 6 महिलांसह 22 जणांना ड्रगसह अटक केली होती.कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न मंगल कार्यालयास दंड ठोठावून सिलही ठोकले होते. गुन्हेगार यांच्यावर कारवाई व वचक ठेवण्यासोबतच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता, द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याने बुडविलेले जवळपास 20 कोटी त्यांनी कारवाई करीत मिळवून दिले आहेत.मालेगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील याने पत्र्याच्या डब्ब्यात सुरू केलेल्या अवैध बायोडिझेल विक्रीसह अनेक अवैध धंद्याचा पर्दाफाश केला होता त्यानंतर त्यांच्या धडाकेबाज कारवाईचा धसका अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या काही राजकीय नेत्यांनी घेत त्यांची मुदतपूर्व बदली केली होती मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देत सरकारवर ताशेरे ओढले होते.