तुळजाभवानी व्हीआयपी दर्शन पास – नियमात मोठे बदल, मोजक्या लोकांना मिळणार लाभ
उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त डॉ योगेश खरमाटे यांचे आदेश
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू असून 7 ऑक्टोबरपासुन देवीचे मंदिर तब्बल 6 महिन्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी वशिलेबाजी व सो कॉल्ड व्हीआयपीना लगाम घालण्यासाठी मंदिर संस्थानने व्हीआयपी दर्शन पासची नियमावली जाहीर केली आहे. मंदिराचे विश्वस्त तथा उपविभागीय महसुल अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनी आदेश जारी केले आहेत.
तुळजाभवानी मंदिर येथे देवीच्या दर्शनासाठी महत्वाचे व्यक्ती व त्यांचे कुटुंबातील सदस्य व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस मोफत अथवा व्हीआयपी दर्शनपास दिला जाणार नाही. महत्त्वाचे व्यक्ती, त्यांची पत्नी किंवा पती,मुले, आई , वडील तसेच मंत्री महोदय यांचे सोबतचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी यांचा समावेश राहील. मंत्री यांच्या सोबत असणारे इतर व्यक्तींना घाटशीळ पार्किंग येथूनच दर्शनाचा लाभ होईल. अन्य कोणाला दर्शन पास दिला जाणार नाही.