‘ देता की जाता ‘ आंदोलनाचा इशारा – शेतकरी 3 आठवड्यापासुन मदतीच्या प्रतीक्षेत
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आक्रमक, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या
उस्मानाबाद – समय सारथी
शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत मिळत नसल्याने ‘देता की जाता’ या आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन 3 आठवडे झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, या काळात मंत्रिमंडळाच्या 3 वेळा बैठका झाल्या तरी कोणताही निर्णय झाला नाही , त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांनी शेतकरी मदतीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मदत जाहीर न झाल्यास आक्रमक आंदोलन करीत मंत्र्यांना जिल्हा बंदीचा इशारा पाटील यांनी दिला.
उस्मानाबाद जिल्ह्यात 20 सप्टेंबरपासून 2 ते 3 वेळेस अतिवृष्टी झाली यात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले याला 15 दिवस उलटला तरी राज्य सरकारने मदत केली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 12 हजार हेकटर क्षेत्राचे नुकसान झाले असुन या अतिवृष्टीचा फटका 4 लाख 55 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. पिके पाण्यात नासुन गेली, शेती खरडून वाहून गेली तर अनेक जनावरे दगावली व घरांची पडझड झाली तरी मदत मिळेना झाली आहे. खरीप 2020 च्या हंगामातील 32 कोटी विमा मंजूर आहे मात्र राज्य सरकारने त्यांचा हप्ता न भरल्याने ती रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही, तसाच काहीसा प्रकार रब्बी 2020 व खरीप 2021 बाबत आहे यातून सरकारची शेतकरीबाबत असलेली असंवेदनशीलता दिसून येते.
13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास परवा पासुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही म्हणून त्यांना खराब झालेले सोयाबीन पीक पाठविण्यात येणार आहे. सरकारने स्थायी आदेशाच्या अतिरिक्त आर्थिक मदतीची मागणी पाटील यांनी केली. जिल्ह्यात मंत्र्यांना यापुढे बंदी असेल असे म्हणाले. यापूर्वी शिवसेना मंत्री याना जिल्हा बंदीचा इशारा दिल्यानंतर एकही शिवसेनेचा मंत्री जिल्ह्यात आला नाही , मी वाट पाहतोय असे सांगत आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा व त्यास ठाकरे सरकार कारणीभूत असेल असा आरोप आमदार पाटील यांनी केला. मुख्यमंत्री, कृषीमंत्री व पालकमंत्री शिवसेनेचे असल्याने आपण खास करून शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदीचा इशारा यापूर्वी दिल्याचे ते म्हणाले
राज्य सरकारकडे पैसे नाहीत असे कारण किंवा चर्चा केली जाते मात्र गेल्या काही दिवसातील निर्णय पाहिले तर सरकार प्राथमिकता पाहून निर्णय घेत नसल्याचे व खर्च करीत असल्याचे लक्षात येईल. राज्य सरकारने अद्याप झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे दिला नाही, तो दिल्यास त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमची असल्याचे पाटील म्हणाले.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, ऍड नितीन भोसले, ओम नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.