डॉ शेंडगेसह साथीदार फरार – रूग्णांची फसवणुक केल्याने गुन्हा नोंद
ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी सांकेतिक भाषा – विमा कंपनीला पण लुटले
उस्मानाबाद – समय सारथी
बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन दोन्ही आरोपी गुन्हा नोंद होताच फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे हे तपास करीत आहेत. डॉ शेंडगे यांनी अनेक रूग्णांची चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देऊन आर्थिक फसवणुक केली आहे तर रुग्णांचे ब्लड रिपोर्ट कमी जास्त करण्यासाठी संकेतीक भाषा वापरली जात असल्याचे चौकशी समितीच्या अहवाल स्पष्ट झाले आहे. डॉ शेंडगे यांना आरोग्य विभागातील काही मंडळींनी पाठबळ दिले होते मात्र अखेर त्यांना कारवाई करावी लागली.
विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले.
शेंडगे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे लॅब ब्लड रिपोर्ट गरजेनुसार कमी जास्त म्हणजे चुकीचे बनविल्या प्रकरणी व रुग्ण ऍडमिट नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय बील उचलल्या प्रकरणी उमरगा येथील डॉ शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे व तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने या घोटाळ्या प्रकरणी चौकशी अहवालानुसार पोलिसात तक्रार द्यावी यासाठी पोलीस विभागाने ४ वेळेस लेखी समजपत्र देऊनही तक्रार न दिल्याने या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नव्हती, अखेर त्यात गुन्हा नोंद झाला आहे.
डॉ शेंडगे हे रुग्णाचे नाव व कोडवर्डच्या खुणा चिट्ठीवर करून द्यायचे, एक बाण, दोन बाण , तीन बाण वरच्या बाजूला असल्यास सादर रुग्णाचे ब्लड रिपोर्ट अहवाल हे वाढवून द्यायचे व खाली बाण केलेला असल्यास त्याचे तपासणी निष्कर्ष कमी द्यायचे असे सांकेतिक भाषेत ठरले होते. प्लस चिन्ह लिहल्यास पॉझिटिव्ह व मायनस चिन्ह लिहल्यास निगेटिव्ह असे समजून तसे रिपोर्ट देण्यास मला भाग पाडत असत. या रुग्णालयाावर माझी उपजिवीका असल्याने मी हे रुग्णाचे खोटे अहवाल दिले असल्याचा कबुली जबाब बनसोडे यांनी तक्रारीत व चौकशी समितीसमोर दिला होता. हा चौकशी अहवाल डॉ आर यु सूर्यवंशी, डॉ सीमा बळे व डॉ रोचकरी यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता मात्र त्यावर कारवाईस टाळाटाळ केली जात होती.
बनसोडेलाच लुटले म्हणून झाला भांडाफोड
डॉ शेंडगे हे करीत असल्याच्या कृत्याचा फटका जेव्हा बनसोडेला बसला तेव्हा त्याने तक्रार केली. डॉ शेंडगे यांनी बनसोडे आजारी नसताना आजारी असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या नावाने विमा कंपनीकडुन वैद्यकीय बिल उचलले त्यानंतर बनसोडे व डॉ शेंडगे यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि सर्व भांडाफोड झाला. बनसोडे यांनी डॉ शेंडगे यांच्या कारभाराची पुराव्यासह पोलखोल केली त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.