उच्च न्यायालयात देवानंद रोचकरी यांच्या जामीन अर्जावर 28 ऑक्टोबरला सुनावणी होणार – मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या जामीन अर्जावर 28 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश एम जी सेवलीकर यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम तूर्तास वाढला आहे. 12 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर पुढील तारीख देण्यात आली आहे. देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट रोजी मुंबई येथुन अटक केल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते 24 ऑगस्टपासुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये आहेत.
उस्मानाबाद जिल्हा कोर्टातील न्यायाधीश एन एच मखरे यांनी त्यांचा जमीन अर्ज फेटाळून लावला होता.मंकावती तिर्थकुंड प्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला होता.