रेल्वेचे भुमीपुजन – मानपान, झेंडे, कलगीतुरा – आरोप प्रत्यारोपाने कार्यक्रम रंगला
पालकमंत्री डॉ सावंत यांचे नाव कोनशीलेवर नाही तर भाजप जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रण नाही
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत रेल्वे स्थानकाच्या पायाभरणी शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
मानपान नाट्य चांगलेच रंगले, ज्येष्ठ भाजप नेते ऍड मिलींद पाटील हे कार्यक्रमात मागे बसले होते यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना पाहून व्यासपिठावर बसवीत यथोचीत सन्मान केला.भाजप वगळता सहयोगी शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाचे झेंडे नसणे यासह खासदार ओमराजे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात परंपरेप्रमाणे विकास कामावरून रंगलेला आरोप प्रत्यारोपाचा सामना व कलगीतुरा यामुळे मोदी यांचा कार्यक्रम चांगलाच गाजला. केंद्र सरकारचा कार्यक्रम अन चर्चा जिल्ह्यातील राजकारणाची अशीच स्तिथी राहिली.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे नाव राजशिष्टाचार नुसार कोनशीलेवर नसल्याची गंभीर बाब समोर आल्यावर खळबळ माजली. शेजारी बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांचे आमदार म्हणून कोनशीलेवर नाव टाकले गेले मात्र मंत्री सावंत यांचे आमदार म्हणून सुद्धा नाव टाकले गेले नाही. सावंत हे राज्याचे कॅबिनेट आरोग्य मंत्री असुन शिंदे फडणवीस सरकार स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विधान परिषदेच्या एकही आमदाराचे नाव टाकले गेले नाही. यापुर्वी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात आमदार धस याना बॅनरवर स्थान दिले गेले नव्हते.
रेल्वे कार्यक्रम सुरुवातीला कार्यक्रमाच्या आयोजनाचा तोरा मिरविणाऱ्या भाजप नेत्यांनी याचे खापर मात्र रेल्वे प्रशासनावर फोडले तर स्थानिक भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रूपरेषा व नियोजन केल्याचे रेल्वेच्या अधिकारी यांनी खासगीत सांगितले. भाजपचे नगरसेवक शिवाजी पंगूडवाले यांनी सावंत यांचे नाव नसल्याने निषेध व्यक्त केला.
भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते अशी कुजबुज यावेळी रंगली त्यावर खासदार ओमराजे यांनी निशाणा साधला. सत्तेतील सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटालाही कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते त्यामुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना लहान शालेय मुलांनी काढता पाय घेतल्याने अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्या अखेर शिक्षकांनी मुलांची मनधरणी केल्याने पुर्वरूप आले तर बक्षीस वितरण वेळी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र खासदार की आमदार यांच्या हातून घ्या हा संभ्रम राहिला त्याची ससेहोलपालट झाली.
मंत्री सावंत यांचे नाव न टाकल्याने शिवसेना आक्रमक झाली असुन जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांनी याचा निषेध केला. राजशिष्ठाचार पाळला गेला नाही, ज्याने हा प्रकार केला आहे तो राजकीय असो की प्रशासकीय अधिकारी त्याचे डोके ठिकाणावर आनण्याचा इशारा दिला.