धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना अटक केली असुन ते सेवन गटातील फरार आरोपी होते, त्यांना कामठा येथून अटक करण्यात आली असुन 17 मे रोजी धाराशिव कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी कांडात प्रथमच सेवन गटातील आरोपीला अटक केली आहे त्यामुळे पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे. आजवर तस्कर गटातील अटक आरोपीना कोर्टाने थेट 14 दिवसांची कोठडी दिली होती तर अटकेतील 6 व फरार 3 अश्या 9 आरोपींना जामीन नाकारला आहे. सेवन गटात काय होते याची काही जन वाट पाहत आहेत त्यावरून पुढील घडामोडी घडणार आहेत. पोलिस व सरकारी वकील यांची कोर्टातील भुमिका व बाजु यात महत्वाची ठरणार आहे. सर्व आरोपीचे ड्रग्ज तस्करांसोबत थेट आर्थिक व्यवहार, संभाषणासह इतर पुरावे तपासात सापडले आहेत. जमदाडे हे भाजपमध्ये असुन ते तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत.
धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सध्या 7 आरोपीचे जामीन अर्ज प्रलंबित असुन त्यात 5 जन फरार आहेत तर 2 आरोपी जेलमध्ये आहेत. सेवन गटातील फरार आरोपी विशाल सोंजी व अभिजीत अमृतराव या दोघांसह तस्कर गटातील फरार आरोपी संतोष कदम परमेश्वर व नानासाहेब कुऱ्हाडे अश्या 4 जणांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 20 व 21 मे रोजी सुनावणी होणार आहे तर धाराशिव जेलमध्ये असलेले ड्रग्ज तस्कर गटातील सुलतान उर्फ टिपू शेख व राहुल कदम परमेश्वर या 2 जणांच्या अर्जासह इतर अटक आरोपींची नियमित सुनावणी 20 व 21मे रोजी होणार आहे तर सेवन गटातील जगदीश जीवन कदम पाटील यांनी अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 16 जणांना अटक केली असुन 20 जन फरार आहेत. 36 पैकी 15 तस्कर व 1 सेवन गटातील आरोपी अटक असुन तस्कर गटातील 26 पैकी 11 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 9 आरोपी फरार आहेत. अटकेतील 16 पैकी 15 तस्कर जेलमध्ये आहेत, सेवन गटातील 1 अटकेत आहे. धाराशिव पोलिसांनी कोर्टात 10 हजार 744 पानाचे दोषारोपपत्र दाखल केले आहेत त्यात 26 जणांवर ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे तर 10 जण सेवन गटात आहेत त्यात माजी सभापती शरद जमदाडे हे आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (20) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 20 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सेवन गट (10 आरोपी) – अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी उपसभापती शरद रामकृष्ण जमदाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडुन ड्रग्ज विकत घेऊन सेवन करुन कलम 27 चे उल्लंघन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे. या 10 आरोपीचे ड्रग्ज विकत घेण्यासाठी केलेले पैशाचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार यांचे जबाब व इतर पुरावे सापडले आहेत, हे विशेष.
अशी झाली अटक (16) – तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली, त्यानंतर 15 एप्रिलला कोर्टात चार्जशीट दाखल करताना माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना 36 वा आरोपी करण्यात आले. तस्कर गटातील रणजीत रंगनाथ पाटील यांना 1 मे रोजी अटक केली त्यानंतर 16 मे रोजी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना अटक केली.