डॉ शेंडगे यांच्या जामीन अर्जावर 23 ऑक्टोबरला सुनावणी – फरार डॉ शेंडगे पोलिसांना सापडेना
रूग्णांची फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा प्रकरण , शेंडगे यांची अनेक प्रकरणे समोर
उस्मानाबाद – समय सारथी
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे संचालक डॉ आर डी शेंडगे यांच्या जामीन अर्जावर 23 ऑक्टोबर शनिवारी होणार असुन डॉ शेंडगे गुन्हा दाखल झाल्यापासुन 12 ऑक्टोबरपासुन फरार आहेत. फरार डॉ शेंडगे व त्यांचा सहायक बनसोडे हे सापडत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेंडगे यांचा जामीन तात्पुरता जामीन उमरगा सेशन कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर याबाबत आता पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती मात्र ती पुढे ढकलली आहे.
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याचे प्रकरण चौकशी समितीत उघड झाल्यानंतर डॉ आर डी शेंडगे हे फरार असुन त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे करीत आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले
डॉ शेंडगे हे करीत असल्याच्या कृत्याचा फटका जेव्हा बनसोडेला बसला तेव्हा त्याने तक्रार केली. डॉ शेंडगे यांनी बनसोडे आजारी नसताना आजारी असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या नावाने विमा कंपनीकडुन वैद्यकीय बिल उचलले त्यानंतर बनसोडे व डॉ शेंडगे यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि सर्व भांडाफोड झाला.
डॉ शेंडगे हे रुग्णाचे नाव व कोडवर्डच्या खुणा चिट्ठीवर करून द्यायचे, एक बाण, दोन बाण , तीन बाण वरच्या बाजूला असल्यास सादर रुग्णाचे ब्लड रिपोर्ट अहवाल हे वाढवून द्यायचे व खाली बाण केलेला असल्यास त्याचे तपासणी निष्कर्ष कमी द्यायचे असे सांकेतिक भाषेत ठरले होते. प्लस चिन्ह लिहल्यास पॉझिटिव्ह व मायनस चिन्ह लिहल्यास निगेटिव्ह असे समजून तसे रिपोर्ट देण्यास मला भाग पाडत असत. या रुग्णालयाावर माझी उपजिवीका असल्याने मी हे रुग्णाचे खोटे अहवाल दिले असल्याचा कबुली जबाब बनसोडे यांनी तक्रारीत व चौकशी समितीसमोर दिला होता. हा चौकशी अहवाल डॉ आर यु सूर्यवंशी, डॉ सीमा बळे व डॉ रोचकरी यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता.