खुलेआम डान्सबार सुरू – 2 आयपीएस अधिकारी असतानाही तुळजापुरात छमछम
उस्मानाबाद – समय सारथी
एकिकडे राज्यात डान्स बारला बंदी असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात खुलेआम डान्स बार सुरू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नीवा जैन व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे 2 वरिष्ठ आयपीएस अधिकारी असतानाही तुळजापुरच्या इतिहासात प्रथमच डान्स बार सुरू झाल्याने थेट पोलीस यंत्रणेला एकप्रकारे आव्हान दिले आहे. यापूर्वी तुळजापूर शहरात कधीही छमछम नव्हती मात्र आता हा नवीन पायंडा सुरू झाला आहे, नळदुर्ग रोडवर काल एका भव्य उदघाटन कार्यक्रमात रेस्टॉरंट व बारमध्ये डीजेच्या तालावर बारबाला नाचवीत डान्स बारची सुरुवात करण्यात आली, या बार मधील काही विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
तुळजापूर येथील स्थानिक पोलीस व यंत्रणेला हा प्रकार माहीत असून यावर पांघरूण घातले जात असल्याने या डान्स बारला पाठबळ कोणाचे हा प्रश्न समोर आला आहे. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असुन इथे राज्यातून भाविक देवी दर्शनासाठी येत असतात, अशा स्तिथीत तुळजापुरात खुलेआम डान्स बार सुरू झाल्याने चुकीचा संदेश जात आहे. तुळजाभवानी देवीचा नवरात्र संपल्यावर अवघ्या 2 दिवसात हा प्रकार समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.