धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्ही पॅट मशीन स्ट्रॉंग रूममधुन मुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने लोकसभेत वापरलेल्या मशीन स्ट्रॉंग रूममधुन काढण्यास परवानगी दिली आहे. लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी शिवसेना उबाठा गटाचे विजयी उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात त्यांनी ओमराजे यांनी निवडणुकीत चुकीच्या मार्गाचा वापर केल्याचा आरोप केला होता. पुन्हा मतमोजणी प्रक्रिया घ्यावी किंवा मशीनमध्ये खराबी असा आरोप याचिकेत नसल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी मशीन स्ट्रॉंग रूममधुन काढण्यास परवानगी मागितली होती ती देण्यात आली आहे.
धाराशिव लोकसभेतील धाराशिव, तुळजापूर, भुम, उमरगा, औसा व बार्शी या 6 विधानसभा मतदार संघातील मशीन ह्या शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथील स्ट्रॉंगरूममध्ये सिलबंद करुन ठेवण्यात आल्या होत्या. 2 हजार 139 मतदान केंद्रातील जवळपास 6 हजार 500 मशीन इथे असुन त्याच्या सुरक्षेसाठी सिसीटीव्ही व पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता,मात्र आता मशीन मुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मशीन सांभाळणे व सुरक्षा देणे हे प्रशासनासाठी एक प्रकारे डोकेदुखीचे ठरले होते.
धाराशिव लोकसभेत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा तब्बल 3 लाख 29 हजार मतांनी पराभव केला. ओमराजे यांना 7 लाख 48 हजार 752 मते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते पडली. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व 1951 च्या नुसार अर्चनाताई पाटील यांनी ओमराजे यांच्यासह 31 उमेदवार याच्या विरोधात 18 जुलै 2024 रोजी याचिका दाखल केली आहे, ती सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. निवडणुक प्रक्रिया राबवीताना अनेक तांत्रिक त्रुटी असणे, ओमराजे निंबाळकर यांनी दबाव आणल्याचा व नियमांचा आणि आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला असुन त्यांच्या भाषणातील काही मुद्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत.
विद्यार्थी यांचे नुकसान – निवडणुकीसाठी स्वतंत्र भवन उभारणे गरजेचे, जागा आरक्षित
राजकीय वाद, आरोप प्रत्यरोपात गेली 10 महिन्यापासुन या मशीन पॉलीटेक्निकल कॉलेजच्या क्लासरूममध्ये ठेवण्यात आल्याने विद्यार्थी यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते, त्यांना इतर रूममध्ये आहे त्या जागेत ऍडजस्ट करावे लागले. अनेक वेळा पाठपुरावा केल्याने अखेर मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्ताने धाराशिव येथे निवडणुकीसाठी स्वतंत्र भवन उभे करणे गरजेचे आहे यासाठी पिंपरी येथे जागा आरक्षित आहे, मात्र त्याला गती येणे गरजेचे आहे. निवडणुक, मतमोजणी, मशीन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या जागा वापरल्या जात असल्याने यंत्रणाची हैरानी होते, सुसूत्रता येण्यासाठी स्वतंत्र भवन असणे गरजेचे आहे.