धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात धक्कदायक माहिती समोर आली असुन एक वेगळे वळण लागले आहे. ड्रग्ज तस्करीत फरार आरोपी असलेल्या विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांनी 25 ऑगस्ट 2024 रोजी एकाच दिवशी तब्बल 1 लाख 85 हजार रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले. ड्रग्ज खरेदी करण्यात पुर्वी त्यांनी मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत याच्याशी थेट संपर्क साधला त्यानंतर गंगणे यांनी 4 जणांच्या फोन पे वरून 1 लाख 85 हजार त्याचं दिवशी ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर ट्रान्सफर केले. मोबाईल संभाषण, फोन पे, पिडीत असलेले साक्षीदार याचे जबाब पोलिसांनी घेतले असुन ते कोर्टात चार्जशीटसोबत सादर केले आहेत. गंगणे यांचे ड्रग्ज तस्कर मुळे, खोत अश्या अनेक जणासोबत आर्थिक व्यवहार व संभाषण पुरावे चार्जशीटमध्ये आहेत. कागदोपत्री पुरावे समोर आल्याने एकंदरीत गंगणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

1 लाख 85 हजार रुपयाचे ( 45 ते 60 पुड्या) एकाच दिवशी ड्रग्ज खरेदी केलेल्या गंगणे यांना पोलिसांनी दोषारोप पत्रात ‘व्यसनी’ ठरवले आहे मात्र इतर पुरावे समोर येत आहेत. शांत डोक्याने कट (Cold Blooded Crime) रचून हे सगळे गेली 2 वर्ष करण्यात आले. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज का व कसे आणले, कुठे साठवले, कोणाला दिले ( विक्री की समाजसेवा म्हणुन वाटले) हा तपासाचा विषय आहे.
गंगणे व ड्रग्ज तस्कर संतोष खोत याच्या 25 ऑगस्ट 2024 च्या दुपारी 4 वाजताच्या एसएमएस संभाषणानुसार खोत याने सांगितले की, भाऊ ह्या वहिनीच्या अकाउंटला 1 लाख 85 हजार ट्रान्सफर मारा व तुळजापूर गुन्ह्यातील ड्रग्ज तस्कर संगीता गोळे (9082041434) हिचा व संतोष खोत (9004869396) याचा नंबर पाठवला. त्यानंतर गंगणे यांनी सुमित संजय शिंदे याच्या फोन पे वरून 40,000 रुपये, 45 हजार व 20 हजार असे 1 लाख 5 हजार टाकले. अविनाश बाळु मुळे याच्या फोन पे वरून 20 हजार, सागर गंगणे याच्या फोन पे वरून 30 हजार व 20 हजार असे 50 हजार टाकले. सत्यम साठे याच्या खात्यावरून 10 हजार असे 4 जणांच्या खात्यावरून 1 लाख 85 हजार संतोष खोत याच्या खात्यावर टाकले व ड्रग्ज घेतले. दुसऱ्याच्या नावाने फोन पे केले व त्यांना रोख रक्कम गंगणे यांनी दिली हे विशेष.

विनोद गंगणे वापरत असलेला 9850110411 हा सिम नंबर सुरुवातीला माजी नगरसेवक नारायण राजे गवळी यांच्या नावावर होता मात्र गवळी हे 2018 साली मयत झाल्यावर त्यांचे मेहुणे कृष्णा दत्तात्रय काळे यांना तो नंबर पोर्ट करुन घ्यायला गंगणे यांनी सांगितला. काळे यांच्या नावावर असलेले मोबाईल सिमकार्ड गंगणे वापरत होते व त्यावरून ड्रग्ज मागवत होते हे आता समोर आले आहे.
ड्रग्ज तस्कर संतोष खोत, संगीता गोळे हे सध्या धाराशिव येथील जेलमध्ये आहेत तर पिटू गंगणे हे फरार आहेत. गंगणे यांनी केलेले कृत्य हे गुन्हेगारी स्वरूपाचा कट (cold blooded crime) आहे. एक दिवस आपण अडकू शकतो म्हणुन पर्याप्त काळजी घेऊन केलेले हा पुर्वनियोजित कट व गंभीर गुन्हा आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे हे कृत्य आहे.
गंगणे यांच्या बाबतीत ज्याच्या खात्याचा वापर झाला त्यांना पोलिसांनी ‘साक्षीदार’ बनवले असुन बहुतांश जबाब हे कॉपी पेस्ट म्हणजे एक सारखेच वाक्यरचनेचे आहेत. गंगणे यांनी ड्रग्ज पकडण्यासाठी ‘खबऱ्या’ बनत पोलिसांना ‘टीप’ दिली होती त्यामुळे त्यांना एकप्रकारे अभय दिल्याचा आरोप होत आहे. 36 आरोपी पैकी 26 जणांना तस्कर पेडलर तर 10 जणांना व्यसनी ठरवले आहे. 36 पैकी 15 जणांना अटक केली असुन 21 जन फरार आहेत. 10 हजार 744 पानाच्या दोषारोप पत्रात अजुन बरंच काही दडलं आहे.