मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण – उच्च न्यायालयात देवानंद रोचकरी बंधूंना 2 महिन्यानंतर जामीन मंजुर
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना अखेर औरंगाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. मंकावती तीर्थकुंड प्रकरणात सुनावणी अंती जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख स्वाती लोंढे यांनी रोचकरी यांच्या नावाची नोंद रद्द करीत महाराष्ट्र सरकारची नोंद लावली आहे. या प्रकरणात अनेक कागदपत्रे पोलिसांनी तपासात हस्तगत केली आहेत तसेच अनेक साक्षीदार हे सरकारी अधिकारी आहेत शिवाय रोचकरी यांच्यावर वैद्यकीय उपचारबाबत कागदपत्रे कोर्टात मांडल्याने त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायाधीश एम जी सेवलीकर यांच्या कोर्टात सुनावणी झाली.
देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट रोजी मुंबई येथुन अटक केल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते 24 ऑगस्टपासुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये आहेत.उस्मानाबाद जिल्हा कोर्टातील न्यायाधीश एन एच मखरे यांनी त्यांचा जमीन अर्ज फेटाळून लावला होता त्यानंतर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता त्यात तब्बल 2 महिन्यानंतर जामीन झाला असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
मंकावती तिर्थकुंड प्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार चौकशी अंती गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.