तेरणेच्या अडचणीत वाढ ? 75 कोटींच्या थकबाकीची मालमत्तेवर नोंद घेण्याचे आदेश
विक्रीकर कार्यालयाने दिले पत्र – सात बारा उताऱ्यावर बोजा नोंद करा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अगोदरच 312 कोटींचे कर्ज असलेल्या तेरणा कारखान्यावर 75 कोटींच्या थकबाकीची नोंद घेण्याचे आदेश विक्रीकर विभागाने दिले आहेत.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्याकडे विक्रीकर कार्यालय उस्मानाबाद यांची 75 कोटी 27 लाख 71 हजार 346 रुपयांची थकबाकी असून या थकबाकी पोटी तेरणा साखर कारखान्याच्या गट क्रमांक 242, 272,273,274,277, 278,279,795,796,797 व 798 या जमिनीवर बोजा नोंद करण्याचे पत्र अभिजीत पोरे , सहाय्यक राज्यकर आयुक्त, वस्तू व सेवा कर कार्यालय उस्मानाबाद यांनी दिले आहे. विक्रीकर कार्यालयाच्या वसुली प्राप्त रकमेची नोंद सातबारावर घेऊन सातबारा उतारे तात्काळ सादर करावे असे स्मरणपत्र ढोकी तलाठी यांना दिले आहे.
तेरणा कारखान्याच्या मालमत्तेवर 51 कोटी व त्यावरील व्याज याची नोंद घेण्याचे पत्र 2016 रोजी 12 जुलै 2016 रोजी दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पत्र विक्रीकर कार्यालयाने जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला दिले आहे. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या तेरणा कारखान्याच्या थकित कर्जात आता विक्री कर विभागाच्या 75 कोटी रुपयांच्या वसुलीची नोंद होणार असल्याने तेरणा कारखाना सुरू करण्यापूर्वीच हे नवीन संकट आले आहे.
तेरणा कारखान्यावर उस्मानाबाद जिल्हा बँकेचे 127 कोटी 31 लाख इतके मुद्दल आहे,त्या कर्जावरील व्याजाची रक्कम 185 कोटी 15 लाख रुपये आहे असे एकुण 312 कोटी 46 लाख रुपयाचे कर्ज कारखान्यावर आहे यामुळे इतके मोठे कर्ज असलेला कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.