डॉ कुतवळ यांना आरोग्य विभागाचे अभय – फौजदारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, आरोग्य उपसंचालक यांच्या अभिप्रायात दोषी – राजकीय पाठबळ ?
न्यायासाठी 20 महिन्यापासुन संघर्ष – 13 वेळा निवेदने, एकदा सहकुटुंब आत्मदहन प्रयत्न
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथील नामांकीत कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ दिग्विजय कुतवळ यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यास आरोग्य विभाग जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रकाश पुणेकर यांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या या भूमिकेबाबत व डॉ कुतवळ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे पुणेकर म्हणाले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद,आरोग्य उपसंचालक यांच्यासह तीन सदस्यीय समितीने मयत रुग्ण प्रतीक्षा पुणेकर प्रकरणात डॉ कुतवळ यांना जबाबदार ठरविले असले तरी त्यांची पाठराखण केली जात आहे. डॉ कुतवळ हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला असुन हे प्रकरण यावरच संपवुन दडपले जात आहे. दरम्यान डॉ कुतवळ हे एका राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने त्याना पाठबळ दिले जात असल्याची चर्चा आहे.
कुतवळ रुग्णालयात 18 वर्षीय प्रतीक्षा प्रकाश पुणेकर या रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता, हा मृत्यू चुकीच्या वैद्यकीय सेवा दिल्याने झाल्याचा आरोप करीत डॉ दिग्विजय कुतवळ यांच्यावर गुन्हा नोंद करून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करीत कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती त्यानुसार तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती त्यानुसार केलेल्या शिफारशीनुसार परवाना रद्द केला आहे. कुतवळ परिवार प्रतीक्षा हिच्या मृत्यूनंतर गेल्या 20 महिन्यापासून न्याय मिळावा यासाठी संघर्ष करीत आहे, त्यासाठी त्यांनी 13 वेळेस विविध निवेदने दिली आहेत तर एक वेळेस सहकुटुंब सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टर दिग्विजय कुतवळ यांच्या बाबत केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे चौकशी प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू आहे. प्रकाश पुणेकर यांनी डॉ दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध खाजगी व्यवसाय करणे, विनापरवाना रुग्णालय सुरू करणे तथा विना पदवीधारक नर्स व वॉर्डबॉय नेमणे अशी तक्रार केली आहे. याबाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक संजय देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील यांना लेखी पत्र दिले आहे. त्यानुसार डॉ कुतवळ यांच्यावर फौजदारी गुन्हा बाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे मात्र फौजदारी कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे.महाराष्ट्र वैद्यकीय परिषद 1967 च्या नियम 62 ते 74 च्या तरतुदीनुसार निष्काळजीपणा व गैरवर्तवणुकीबाबत दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या स्तरावर चौकशी सुरू आहे.
लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले यांनी डॉ कुतवळ यांच्याबाबत आरोग्य विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे, त्यात त्यांनी रुग्ण प्रतीक्षा पुणेकर प्रकरणात डॉ कुतवळ यांचा हलगर्जीपणा दिसून येतो तसेच रुग्णाच्या मृत्यूस डॉ कुतवळ हे सर्वस्वी जबाबदार असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद केले आहे तसेच डॉ कुतवळ यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची शिफारस आरोग्य विभागाच्या आयुक्तांना केली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ माले यांच्याच्या अभिप्रायनुसार मयत रुग्ण प्रतीक्षा पुणेकर प्रकरणात डॉ कुतवळ यांचा हलगर्जीपणा व ते जबाबदार असल्याचे स्पष्ट होऊनही रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यास आरोग्य विभाग हेतुतः टाळाटाळ करीत आहे.
डॉ कुतवळ यांचा वैद्यकीय अधिकारीपदाचा एनपीए भत्ता बंद करण्यात आला असून मागील एनपीए वसुली करण्याची कार्यवाही सुरू आहे असे पत्र तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी तक्रारदार प्रकाश पुणेकर यांना दिले आहे. डॉ कुतवळ यांनी दिशाभुल करून एनपीए भत्ता उचलला असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही त्यांच्यावर केवळ वसुलीची कार्यवाही करत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.