जनजागृतीसाठी 9 कोटी, राजकीय आखाडे वेगळे, योग्य वेळी पाहु – वडिलांचा अभिमान, त्यांनी ड्रग्ज तरी विकले नाही
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणावरून आमदार राणाजगजीतसिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. ड्रग्जचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी काढला, त्यानंतर ओमराजे आक्रमक झाले. आरोप प्रत्यारोप होत असताना पालकमंत्री यांनी दोघांना शांत करीत ड्रग्ज गुन्ह्यातील 22 फरार आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले असुन उपाययोजना व जनजागृतीसाठी 9 कोटी निधी जाहीर केला. आरोपीना अटक करण्यात येईल, त्यात तपासात आणखी काही आरोपी वाढतील व आरोपीना अटक केले तरी पुढे काय कारवाई करायची याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. आपण यात फाशी देऊ शकत नाही मात्र ते म्हतारे होईपर्यंत जास्त काळ जेलमध्ये राहतील असा इशारा पालकमंत्री यांनी दिला.
ड्रग्ज प्रकरणात कुटील राजकारण, कांगावा करू नका, राजकीय आखाडे वेगळे आहेत, योग्य वेळी पाहू असा इशारा आमदार राणाजगजीतसिंह यांनी खासदार ओमराजे यांना दिला. आरोपी कोणाच्या जवळचे हे सर्वांना माहिती आहे, माझ्या वडिलांवर दुधवाला असे आरोप करण्यात आले, मला त्यांचा अभिमान आहे, त्यांनी ड्रग्ज तरी विकले नाही असे ओमराजे म्हणाले. ज्यांनी ड्रग्जवर आवाज उठवला त्यांना चोर ठरवत आहेत आणि ज्यांनी व्यसन केले, विक्री केली त्यांना चांगले ठरवले जात आहे असा आरोप ओमराजे यांनी केला.
आमचे, माझ्या सोबतचे असलेल्या लोकांचे नंबर तपासा, आमचा सहभाग असेल, तर थेट फासावर लटकवा. यात राजकारण कुठे आले, जे बंद करा म्हणत आहेत, त्यांचे कार्यकर्ते, जवळचे लोक यात अडकले आहेत. ज्याचा भाऊ आरोपी होता त्यांनी तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आमचा बाप काढला, इतकी हिम्मत कुठून येते. माझे वडील दूधवाला आहे असे आरोप करण्यात आले. मला अभिमान आहे त्यांनी दुध विकलं, त्यात चुकीचं काय? आम्ही ड्रग्ज तरी विकलं नाही असा संतप्त सवाल ओमराजे यांनी केला. आम्ही राजकारण करतोय असा आरोप केला जातोय काय राजकारण केले ते तर कळू द्या, ड्रग्जमध्ये कोणत्या नेत्याचा यात संबंध आहेत हे कळू द्या असे ते म्हणाले.ज्यावेळी ड्रग्ज व्यसनाचे कळले त्यावेळी गप्प राहिले, विधानसभा निवडणुक होण्याची वाट का पाहिली असा सवाल केला.
तरुण पिढीसाठी हा महत्वाचा विषय आहे, ड्रग्ज घातक आहे. मी तुळजापूर येथे गेल्यावर पूजारी यांनी तक्रार केली, की ड्रग्ज हा महाभयंकर रोगासारखा तुळजापूर येथे पसरला आहे. त्यानंतर मी कारवाईचे आदेश दिले. कोणीही असेल, कोणाच्या जवळचा, कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई करा,ड्रग्ज निस्तानाबूत करा असे आदेश दिले. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पण तसे आदेश दिले आहेत असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
तुळजापूर गुन्ह्यात 22 आरोपी असुन त्यांना अटक करण्याचे निर्देश कालच आल्यावर पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत. नार्कोटीक्स विभागाला आरोपीचा ताबा द्या, ते इतर गुन्ह्यात सहभागी किंवा तस्करीत आहेत का हे चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांना तपास करू द्या तपासात राजकारण करू नका कोणीही आडवे आले तरी त्याला सोडले जाणार नाही असे पालकमंत्री म्हणाले.
पोलिसांना माहिती असताना कारवाई होत नव्हती, विधानसभा निवडणुकीपुर्वी मला काही महिलांनी तक्रार केली त्यानंतर मी निवडणुका झाल्यावर पोलिसांना माहिती दिली, पोलिसांकडे कोणतीही माहिती नव्हती मी दिली त्यानंतर 2-3 प्रयत्न अयशस्वी झाले मात्र मी एकाला जोडून दिले,त्यानंतर पोलिसांनी यशस्वी कारवाई केली. कोणी किती कांगावा केला तरी काही होणार नाही. मी माहिती उपलब्ध केली त्यामुळे हे झाले. त्यात कोणी कुटील राजकारण करू नये हे सगळं संपवून टाकायचे आहे असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. ड्रग्जबाबत माहिती कोण दिली व आरोपीना पकडून कोण दिले हेही महत्वाचे आहे यात राजकारण करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. गणेशोत्सव काळात मी यावर तुळजापूर येथील भाषणात जाहीर बोललो होतो असे ओमराजे म्हणाले..
ओमराजे व आमदार पाटील यांच्यात शाब्दिक वाद वाढत असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री सरनाईक यांनी दोघांना आवरत मध्यस्थी करीत समन्वयाची भुमिका बजावली. ड्रग्ज विषयावर वाद सुरु आहे हे सगळ्यांनी बंद करा, सगळ्यांच्या भावना सारख्या आहेत, त्या लक्षात आल्या आहेत. ड्रग्ज विक्री होऊ नये यासाठी 9 कोटीचा निधी पालकमंत्री यांनी जाहीर केला. रोड सेफ्टी निधी अंतर्गत येणारा निधी यासाठी देतो असे त्यांनी जाहीर केले. धाराशिव जिल्ह्यासाठी प्रत्येक शाळेत जनजागृती करावी, त्यासाठी लागणारा खर्च देण्याची जबाबदारी मी घेत असुन त्यासाठी 9 कोटी निधी देणार असल्याचे ते म्हणाले.