तुळजाभवानी देवीची बोगस वेबसाईट व भाविकांची फसवणुक प्रकरण
एकास अटक, 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
तुळजाभवानी मंदिर संस्थान व तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भाविकांची विविध पुजा करण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपी केदार दीपक लसणे यास तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी लसणे यास तुळजापूर कोर्टाने 3 दिवसांची 13 नोव्हेंबर शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात 4 वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात होता त्यातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वेबसाईट कधीपासुन सुरू होती व किती भाविकांची दर्शनाच्या नावावर आर्थिक लुट करण्यात आली याबाबी तपासाअंती स्पष्ट होणार आहेत.
बोगस वेबसाईटवर तुळजाभवानी देवीच्या भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी चौकशी व कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त सदस्य श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर, रोहन शिंदे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन यांनी चौकशी केली.
तुळजाभवानी मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाइट www.shrituljabhavani.org असताना बोगस वेबसाईट तयार करून काही मंडळी भाविकांकडुन देवीच्या विविध पुजा व विधी करण्याच्या नावाखाली आर्थिक रक्कम ऑनलाईन घेत होते.अज्ञात लोकांनी www.tuljabhawanipujari.com,www.tuljabhwanimandir.org,www.shrituljabhavani.com,wwww.epuja.co.in या चार वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले, विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तुळजाभवानी नवरात्र काळात राजरोस सुरू होता. या बोगस वेबसाईटवर तुळजाभवानी देवीच्या अभिषेक, अलंकार महापूजा, खण -नारळ ओटी पूजा , जागरण गोंधळ, अन्नदान आशा पूजा करण्याचे अमिश दाखवुन ऑनलाईन पैसे जमा करून घेतले जात होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420 फसवणुक,माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 सी व डी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ज्या भक्तांनी यासह अन्य बोगस वेबसाईटवर दिलेल्या आमिषाला बळी पडून पुजा व विधीसाठी पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यांनी मंदिर संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.