धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाभवानी मंदीर संस्थांनाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असुन भक्तांनी देवीला भरभरून सोने व चांदी अर्पण केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात तुळजाभवानी मातेच्या चरणी 17 किलो सोने तर 256 किलो चांदी अर्पण करण्यात आली, तर विविध मार्गाने मंदिराच्या उत्पन्नात 80 कोटी 81 हजार जमा झाले, गेल्या वर्षी 2023-24 मध्ये 66 कोटी रुपये जमा झाले होते त्याच्या तुलनेत यंदा तब्बल 14 कोटी रुपयांची वाढ झाली. मंदीर संस्थानने या उत्पन्नातुन भविकांना, नागरिकांना आणखी चांगल्या व सुलभ सुविधा दयाव्यात अशी मागणीही होत आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, विद्यमान अध्यक्ष किर्ती किरण पुजार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, पाळीकर, भोपे, उपाध्य पुजारी मंडळ, पुजारी, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी नागरिक यांच्या एकत्रीत प्रयत्नाचे हे फलित आहे. 2022-23 ला 54 कोटी 23 लाख, 2023-24 ला 66 कोटी 81 लाख तर 2024-25 ला 80 कोटी 81 लाख उत्पन्न मिळाले, 2022-23 च्या तुलनेत 26 कोटी अधिक मिळाले गेली सलग 2 वर्ष उत्पन्नात वाढ होत आहे. 2022-23 वर्षात 20 किलो सोने व 359 किलो चांदी भाविकांनी अर्पण केली, 2023-24 मध्ये 16 किलो सोने 270 किलो चांदी, 2024-25 मध्ये 17 किलो सोने तर 256 किलो चांदी अर्पण करण्यात आली. यंदा 1 किलो सोने जास्त आले असले तरी 14 किलो चांदी कमी मिळाली आहे. मंदीर संस्थानच्या विविध 5 बँकेत 274 कोटी रुपयांच्या ठेवी असुन त्यावर 23 कोटी 81 लाख व्याज मिळते.