लेखाजोखा – भुम परंडा मतदार संघात छप्पर फाडके निधी, विकासकामे
पालकमंत्री डॉ सावंतांना मिळाले जेएसपीएम स्वतंत्र विद्यापीठाचे रिटर्न गिफ्ट
उमरगा,लोहारा व तुळजापूर भाग दुर्लक्षितच – बैठक, जनता दरबाराचा दौरा नाही
धाराशिव – समय सारथी
आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे मंत्री झाल्यापासुन भुम परंडा वाशी या त्यांच्या मतदार संघात करोडो रुपयांचा छप्पर फाडके निधी मिळाला आहे. मतदार संघात रस्ते,जलसंधारण व सिंचनासह प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय यासह अन्य वैद्यकीय सुविधाच्या कामास मंजुर मिळाली असुन ती लवकरच पुर्णत्वास जातील ही अपेक्षा आहे. मंत्री सावंत यांच्याकडे आरोग्य खाते असल्याने या भागात रुग्णालय व श्रेणीवर्धन केल्याने भविष्यात चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
शिंदे-फडणवीस या सत्ता परिवर्तनाच्या बंडानंतर आमदार डॉ तानाजीराव सावंत यांना सत्तेत मंत्री पदाच्या रूपाने वाटा मिळाला. हिंदुत्व व जनतेच्या मनातील सरकार आणि मतदारांचा कौल या मुद्यावर सत्ता परिवर्तनासाठी मंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात 150 गुप्त बैठका घेतल्याचा दावा भाषणात केला.
सावंत मंत्री झाल्यावर धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी या मतदार संघाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले तसे सावंत यांना पण आले. रस्ते, सिंचनासह ग्रामीण रुग्णालय व इतर आरोग्य विषयक बाबीसाठी रुग्णालये मंजुर होत करोडो रुपयांचा विक्रमी निधी इतर तालुक्याच्या तुलनेत मिळाला. 21 टीएमसी पाणीसह अन्य प्रलंबित विषय विकासाच्या पटलावर आले आहेत.
मंत्री झाल्यापासून एक वर्षात सावंत यांचा अद्याप लोहारा, उमरगा, तुळजापूर या भागात एकही शासकीय कामांचा दौरा, जनता दरबार वा आढावा बैठक झाला नाही तर पालकमंत्री म्हणून इतर तालुके व मतदार संघाना फारसे काही मिळाले नाही, हेही एक वास्तव आहे. इतके दिवस आयात पालकमंत्री अशी धाराशिव जिल्ह्यात प्रथा होती मात्र सावंत पालकमंत्री झाल्याने संपुर्ण जिल्ह्यात विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या 40 वर्षात विकास झाला नाही, जिल्हा इथल्या नेत्यांनी आमदारांनी भकास ठेवला मात्र मी करुन दाखवणार असे मंत्री सावंत यांनी आश्वासित केले.
सावंत यांना मंत्रीपद बहाल केल्यानंतर दुसऱ्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 17 नोव्हेंबर रोजी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थात जेएसपीएम हे स्वतंत्र विद्यापीठ मंजुरीचा निर्णय झाला त्यानंतर जेएसपीएम युनिर्व्हसिटी विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर झाले. नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता त्यानुसार विद्यापीठ मंजुरी मिळाली आहे. हे विद्यापीठ पुणे जिल्ह्यातील ‘हवेली’ तालुक्यात उभारण्यात येणार आहे.
मंत्री झाल्यावर सावंत यांना सत्तापरिवर्तनाचे विद्यापीठ रूपात एक प्रकारे रिटर्न गिफ्टच दिल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठ कुलगुरूच्या रूपाने कायम लाल दिवा सावंत यांच्या अंगणात राहणार आहे.
राज्यातील पवार,देशमुख, मुंडे,पाटील यासारख्या दिग्गज राजकीय घराणे, नेत्यांना किंवा शिक्षण सम्राटांना स्वतंत्र विद्यापीठ सुरु करता आले नाही. त्यांना जे जमले नाही ते मंत्री सावंत यांनी स्वतंत्र विद्यापीठ पदरात पाडून एका झटक्यात ‘करुन दाखविले’ ही सुद्धा जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे असेच आता म्हणावे लागेल यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना हक्काची शैक्षणिक सोय पुणे सारख्या महानगरात होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा येथे येऊन साखर कारखानदारी सुरु केली. आमदारकी व त्यानंतर मंत्रीपद मिळविले व त्याच मंत्रीपदाच्या जोरावर स्वतंत्र विद्यापीठ मंजुर करुन घेतले त्यामुळे जिल्ह्यासाठी त्यांचे दायीत्व ते पुर्ण करतील ही अपेक्षा आहे. जेएसपीएम विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्ट्या मागास धाराशिव जिल्ह्यात व भुम परंडा भागात शैक्षणिक संकुलाच्या रूपाने एखादी शाखा सुरु होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
धाराशिव जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या तुलनेत त्यातच भुम परंडा वाशी मतदार संघाला अधिकचा निधी आणल्याचा दावा मंत्री सावंत यांनी केला आहे. भुम परंडा मतदार संघात आता पायाभूत सुविधा होणार असुन शैक्षणिक सुविधा झाल्यास त्यात भर पडणार आहे.