धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत त्यांच्या हातुन तुळजाभवानी मंदिरात पुजाविधी करण्यासाठी बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ड्रग्ज प्रकरणात 36 आरोपी पैकी काही जन पुजारी आहेत त्यांना हा निर्णय लागु असणार आहे, मंदीर संस्थान अश्या आरोपींची नावे पोलिस विभागाकडुन घेणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव उपस्थितीत होत्या.
तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या ट्रस्टची बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुजारी मंडळासोबत चर्चा झाली, त्यांना बोलावले व त्यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस विभागाने ड्रग्ज प्रकरणात चार्जशीट दोषारोपपत्र दाखल केले आहे, त्यात 36 आरोपी आहेत. मंदीर व्यवस्थापकाला सुचना दिल्या आहेत की याची माहिती पोलिस विभागाकडुन घ्यावी. पुजारी मंडळ यांना पण सुचना केली आहे की न्यायालयात जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पूजेच्या पाळीत संबंधित लोकांचे नाव किंवा शिफारस देऊ नये. मंदिराचे पवित्र्य राहावे यासाठी पुजारी मंडळ पण आमच्या प्रशासनाच्या भूमिकेशी सहमत आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे, थोडक्यात ड्रग्ज तस्करीत आरोपी असलेल्याच्या हातुन पुजा विधी करण्यासाठी बंदी असणार आहे. निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर ही बंदी उठवण्यात येणार आहे. मंदिरात देऊळ ए कवायत हा नियम जरी आतील कामासाठी असला तरी सामाजिक व्यापक विचार सर्वांना करावा लागेल असे जिल्हाधिकारी म्हणाले.