धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 24 एप्रिल रोजी 7 आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार असुन फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग व इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर या 2 आरोपींचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे याच्या अटकपुर्व असे 7 जणांच्या जामीन अर्जावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे कोर्टात सरकार व पोलिसांच्या वतीने बाजु मांडणार आहेत. ड्रग्ज तस्करीतील 36 पैकी तब्बल 22 आरोपी गेली 1 महिन्यापेक्षा जास्त काळापासून फरार आहेत.
कोर्टाने स्वराज उर्फ पिनू तेलंग, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर या 2 आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असुन त्यांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळे या 7 आरोपींच्या जामीनावर कोर्ट काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. 2 ही आरोपीबाबत प्राथमिक पुरावे असुन त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तुळजापूर व आसपासच्या भागात हे ड्रग्ज विक्री करीत होते, 22 आरोपी फरार असुन पोलिसांना सखोल तपास करण्याची संधी देणे गरजेचे आहे. ड्रग्ज हे समाजासाठी घातक असुन त्याचा तपास होणे गरजेचे असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे. मिटू ठाकुर हा समाजसेवक असुन त्याने पोलिसांची पोलखोल व अनेक गुन्हे तक्रारी केल्याने त्याला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा आरोप केला होता तर पिनू तेलंग याला दुर्धर आजार असल्याचे कारण मांडले होते मात्र कोर्टाने साफ नकार दिला.
फरार आरोपी (22) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.