धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने सुपारीची तस्करीचे रॅकेट उघड करीत जवळपास 2 कोटी 25 लाख रुपयांची सुपारी जप्त केली आहे. ही सुपारी कर्नाटकमधुन दिल्लीसह देशभर पाठवली जात होती, पोलिसांनी राजस्थान, गुजरात, कर्नाटक पासिंगच्या 12 गाड्या पकडल्या आहेत. धाराशिव पोलिस व अन्न औषध विभागाने ही मोठी कारवाई केली.
धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई करीत एका टोलनाक्यावर 12 गाड्या पकडल्या आहेत, या गाड्यात भेसळयुक्त सुपारी असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात खराब, भेसळयुक्त सुपारी मोठ्या प्रमाणात आणली जात असल्याची माहिती मिळताच धाराशिव पोलिस व अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. सुपारी व गाड्या असा 10 कोटी पेक्षा अधिक मुद्देमाल आहे.
खराब असलेली सुपारी इतर पदार्थ गुटखा यात मिसळली जात असल्याचा संशय असुन ती कुठून आली व कशासाठी वापरली जात होती, याचा तपास सुरु आहे. गाड्या व जप्त मुद्देमाल हा तपासणीसाठी धाराशिव येथे नेण्यात आला असुन त्याची तपासणी सुरु आहे त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. नळदुर्ग जवळील फुलवाडी टोलनाका येथे ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या व नळदुर्ग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.