ती गर्भवती अल्पवयीन मुलगी बालविवाहाची पिडीत – तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या मुलीचा शोध लागला
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी एक 13 ते 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर त्या मुलीचा शोध घेण्यात तुळजापूर पोलिसांना यश आले आहे. ती अल्पवयीन मुलगी बालविवाहातून गर्भवती झाली असुन ती बालविवाहाची पीडीत असल्याचे प्राथमीक चौकशीत समोर आले आहे. या मुलीसोबत असलेल्या अन्य अल्पवयीन मुलींना सुद्धा 1 किंवा 2 बालके असल्याचेही समोर आले आहे.आजही बालविवाह मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या प्रकाराने समोर आले आहे मात्र याची नोंद संबंधीत विभागाकडे नाही.
बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांनी या मुलीचे प्रकरण समोर आणले होते. त्यानंतर प्राथमिक तपासात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. तुळजापूर शहर व मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या व फुटपाथवर सामानाची विक्री करणाऱ्या अनेक मुलींचे बालविवाह झाले असुन त्यांना 2 ते 3 मुली आहेत. असे अनेक प्रकार असले तरी याबाबत महिला व बालविकास विभाग किंवा प्रशासन कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही हे दुर्दैव आहे. प्रशासनाकडे या मुलींची किंवा भीक मागणाऱ्या मुली मुले कुठून आली याची कसलीही नोंद नसल्याचे बोंदर म्हणाले.
तुळजाभवानी मंदिर परिसरातील शिक्षणबाह्य बाल भिक्षेकरीना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व अल्पवयीन मुलांचा भिक मागण्यासाठी वापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी विशेष बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बालकांकडून करवून घेतले जात असलेले कृत्य हे बालकांच्या अधिकारांच्या विरोधी तर आहेच पण बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम,२०१५ मधील कलम ७९ अन्वये शिक्षापात्र गंभीर गुन्हा देखील आहे त्यासाठी पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे बालकांना अशा शोषणापासून मूक्त करणे आवश्यक आहे, त्यांना त्यांचे बाल अधिकार मिळावेत यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.