धाराशिव – समय सारथी
सोलापूर पोलिसांनी बार्शी येथे मोठी कारवाई करीत 20 ग्रॅम ड्रग्ज, गावठी पिस्टेलसह 3 जणांना अटक केली असुन त्यातील 2 आरोपी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील आहेत. या प्रकरणात सोलापुर पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली असुन पकडलेल्या 10 पुड्या ड्रग्ज की युरिया, कॅल्शियम क्लोराईड ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रग्ज आहे की नाही हे तपासणीसाठी फिल्ड टेस्ट कीटचा वापर करणे बंधनकारक असुन त्यानंतर पुढील कारवाई अपेक्षित आहे, मात्र राज्यातील अनेक पोलिस ठाण्यात अश्या कीट उपलब्ध किंवा पुरवठा केला नाही. ड्रग्जच्या नावाखाली युरिया मिश्रित औषधाच्या गोळ्या देऊन पैसे उकळण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले असुन त्यासाठी कारवाईपुर्वी फिल्ड टेस्ट कीट व प्रयोगशाळा अहवाल महत्वाचा आहे. परंडा येथील कारवाईत जप्त मुद्देमाल कॅल्शियम क्लोराईड सापडला त्यामुळे बार्शीकडे लक्ष लागले आहे.
बार्शी येथे 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्या ड्रग्ज पकडले असुन हे ड्रग्ज कुठून आणले होते व कोणाला दिले जाणार होते याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
परांडा रोडवरील स्वराज हॉटेल समोर बुधवार 17 एप्रिल रोजी रात्री 11.30 च्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 13 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये असद हसन देहलुज (वय 37, रा. पल्ला गल्ली, परांडा), मेहफुज महंमद शेख (वय 19, रा. बावची, परांडा) आण सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय 32 रा.काझी गल्ली, बार्शी) यांचा समावेश आहे. एनडीपीएस ऍक्ट कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असद देहलूजकडे 9.19 ग्रॅम ड्रग्ज 5 पुड्या व पिस्टल, मेहफुज शेख कडे 5.73 ग्रॅम ड्रग्ज 2 पुड्या व सरफराज उर्फ गोल्डी कडे 5.12 ग्रॅम 3 पुड्या असे 20 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले.
फील्ड ड्रग्ज टेस्ट किटचे महत्व –
अमली पदार्थ ओळखण्यासाठी फील्ड ड्रग्ज टेस्ट किट ही पोलिसांकडे असते त्याचा वापर करणे अपेक्षित आहे. ही किट वापरून लगेचच पदार्थाची प्राथमिक चाचणी करता येते. Marquis Reagent टेस्ट ही एमडी ड्रग्ज असल्यास विशिष्ट रंगद्रव्य (जसे की गडद जांभळा/काळा) तयार होते. Simon’s Reagent टेस्ट ही एमडी ड्रग्जमधील विशिष्ट घटकांची ओळख करण्यात मदत करते. फील्ड टेस्टमध्ये संशयास्पद पदार्थाचे संकेत मिळाल्यास साधारणपणे पोलिस पुढील कारवाई करतात ही कार्यपद्धती आहे. फिल्ड टेस्ट नंतर अंतीम निर्णयासाठी प्रयोगशाळा अहवाल महत्वाचा मानला जातो, त्यावर सर्व ठरते.