धाराशिव – समय सारथी
गेल्या काही दिवसांपासून उमरगा शहर आणि तालुक्यातही गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असुन पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी दबाव टाकला जात असुन गुंडाना आश्रय दिला जात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करीत भेट घेऊन निवेदन दिले. गुन्हेगारीच्या विरोधात आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांचा विरोधात कारवाई न झाल्यास शांततेच्या मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील चौगुले यांनी दिला. उमरगा गुन्हेगार व अवैध धंद्याचे ‘हब’ हब बनले असुन सत्ताधारी माजी आमदार यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पोलिसांवर दबाव व गुंडाना आश्रय देणारा ‘तो’ कोण याची चर्चा रंगली आहे. सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या चौगुले यांना मुख्यमंत्री यांना भेटून लेखी निवेदन द्यावे लागते त्यावरून अवैध धंदे किती बोकाळले आहेत, याची तीव्रता लक्षात येते .
उमरगा शहरात 15 एप्रिलला एका तरुणावर चौघांनी भरदिवसा धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या काही दिवस अगोदर बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला उमरगा शहरात पोलिसांनी अटक केली होती. उमरगा शहरात कोयत्यासारखी शस्त्रे सोबत घेऊन फिरणाऱ्या गुंडांची संख्या वाढली आहे. अगदी किरकोळ कारणावरून मारहाण करण्याचे, हाणामारीचे प्रकार घडू लागले आहेत. या प्रकारांमुळे उमरगा शहरातील शांतताप्रिय नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
उमरगा लोहारा तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिक उपचारांसाठी, खरेदीसाठी उमरगा शहरात येत असतात. सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे हे नागरिक उमरगा शहरात येण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिस अशा गुन्हेगारांवर कारवाई करतात, मात्र गुन्हेगारांवर कारवाई करू नये, अशा प्रकारचा दबाव कोणाकडून पोलिसांवर टाकला जात आहे का, हे उमरगावासियांना कळणे गरजेचे झाले आहे.
शिक्षणासाठी ग्रामीण भागातून उमरगा शहरात येणाऱ्या मुला-मुलींची संख्या मोठी आहे. गेल्या चार-पाच दिवसांत घडलेल्या दोन्ही गंभीर गुन्हेगारी घटना या महाविद्यालयाच्या, खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही गुन्हेगारी मोडित काढन उमरगा शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत. मात्र कारवाई करू नये, यासाठी पोलिसांवर कुट्न तरी दबाव येत असण्याची शक्यता आहे. पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या आणि गुंडांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
पोलिसांनी दबाव झुगारून काम करावे, गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी भावना उमरग्यातील नागरिकांची आहे. लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी गुंडाच्या टोळ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.