धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराबद्दल अर्वाच्य भाषा वापरुन, पत्रकार परिषदेत जाहीरपणे धमकी दिल्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. पत्रकारांवर दबाव टाकणाऱ्या आणि धमक्या देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्ह्यातील पत्रकारांनी जाहीर निषेध करीत संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. तातडीने कारवाई नाही झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनाच्या पत्रकार यांनी एकत्र येत निवेदन दिले.
जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष देविदास पाठक, जिल्हा मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी राजाभाऊ वैद्य, महेश पोतदार, चंद्रसेन देशमुख, ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी निरफळ, श्रीराम क्षीरसागर, अप्पासाहेब शेळके, बालाजी सुरवसे, मल्लिकार्जुन सोनवणे, आकाश नरोटे, सलीम पठाण, प्रशांत कावरे, शिला उंबरे पेंढारकर, संगीता काळे, प्रमोद राऊत, सुभाष कदम, अमजद सय्यद, काकासाहेब कांबळे, राकेश कुलकर्णी, गणेश जाधव, सागर जाधव, दीपक जाधव, किरण कांबळे, पांडुरंग मते, कुंदन शिंदे, मच्छिन्द्र कदम, प्रवीण पवार, संतोष जाधव, रहीम शेख, संतोष शेटे, शितल वाघमारे, प्रतीक थिटे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
तुळजापूर येथे शनिवार दिनांक 12 एप्रिल 25 रोजी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे यांनी तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये विजय गंगणे आणि त्यांच्यासोबत बसलेल्या व्यक्तींनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या बातम्या पत्रकारांनी केल्यामुळे बदनामी झाल्याचा अनाकलनीय आरोप केला आहे. याच पत्रकार परिषदेत इंद्रजीत साळुंके (रा. तुळजापूर) या व्यक्तीने पत्रकाराला नागवे करण्यात येईल अशी गंभीर धमकीही दिल्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. या जाहीरपणे दिलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या धमकीद्वारे लोकशाहीमधील आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच अशा जाहीरपणे धमक्या देऊन पत्रकारांवर दबाव टाकण्याचाही प्रकार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
विजय गंगणे यांचा भाऊ विनोद उर्फ पिटू गंगणे हा ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी आहे. या संबंधित सूड भावनेतुन आणि आजपर्यंत आलेल्या बातम्यांचा राग मनात ठेऊन, पत्रकारांना जाहीरपणे नागवे करण्याची धमकी या पत्रकार परिषदेत दिली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेक आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पत्रकारांना पत्रकारितेच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठीच, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हा प्रकार घडवून आणलेला असण्याची शक्यता आहे. पुढील काळात सर्व पत्रकारांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा पत्रकारांना कोणत्या ही प्रकारची हानी पोहचवल्यास सबंधिताना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे.