धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात तामलवाडी पोलिसांनी हजारो पानाचे दोषारोपपत्र धाराशिव येथील कोर्टात सादर केले, या दोषारोप पत्रात दडलंय काय हे लवकरच स्पष्ट होणार असुन तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांनी हे दाखल केले. ड्रग्ज तस्करीत 35 आरोपी असुन त्यापैकी 21 जन फरार आहेत तर 14 जन जेलमध्ये आहेत. जणांनी जामीनीसाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे ड्रग्ज प्रकरणात ज्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे व फरार आरोपी विनोद गंगणे यांचे बंधु विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस मंगळवारी आरोपपत्र दाखल करणार असा दावा केला होता , तो तंतोतंत खरा ठरला आहे.
ड्रग्जचे मुंबई, पुणे, सोलापूर असे कनेक्शन उघड झाले असुन या दोषारोप पत्रात निष्पन्न आरोपी, कागदपत्रे, झालेला तपास, समोर आलेले व उपलब्ध पुराव्या आधारे पोलीस पुराव्याची साखळी जोडली आहे. ड्रग्ज तस्करीत प्रत्येकाचा सहभाग अधोरेखित केलेला आहे. ड्रग्ज तस्करासोबत झालेले बँक डिटेलचे आर्थिक व्यवहार, ऑडियो रेकॉर्डिंग तपासात सापडले असुन त्याचे आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत तसेच कॉल डिटेल व इतर पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे तस्कर, पेडलर, व्यसन करणारे असे वर्गीकरण केले गेले आहे.
ड्रग्ज तस्करीचा मुळं हेतू काय,कोण व का आणले? फायनान्सर कोण? किती संपत्ती कमावली? यासह अनेक मुद्दे पोलिसांनी कोर्टात रिमांड वेळी उपस्थितीत केले होते त्या सगळ्यांची प्राथमिक उत्तरे या दोषारोप पत्रात मिळण्याची शक्यता आहे. काही आरोपी दोषारोपपत्र कोर्टात सादर होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत फरार आहेत, त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.