रूग्णांची फसवणुक प्रकरण – आरोपी बनसोडेला 4 दिवसांची पोलीस कोठडी तर डॉ शेंडगे फरारच
उस्मानाबाद – समय सारथी
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याचे प्रकरणी उमरगा येथील डॉ आर डी शेंडगे हॉस्पिटलचे तत्कालीन लॅब टेक्निशियन आरोपी तानाजी बनसोडे याला उमरगा कोर्टाने 29 नोव्हेंबरपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बनसोडे पोलिसांना शरण येत स्वतः हजर झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता
पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपी डॉ शेंडगे हे अद्याप फरार आहेत. बनसोडे यांला अटक करून काय होते हे पाहण्याची डॉ शेंडगे याची खेळी यशस्वी होते का ? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. 12 ऑक्टोबरला गुन्हा नोंद झाल्यापासुन मुख्य आरोपी डॉक्टर आर डी शेंडगे हे अजून फरार आहे
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे संचालक डॉ आर डी शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तीन सदस्यच्या समितीसमोर आलेले डॉक्टरचे हस्ताक्षर आणि डॉक्टर यांनी बनसोडे यांच्याकडे दिलेल्या कागदावर असलेले हस्ताक्षर यात तफावत दिसून आली. डॉ शेंडगे यांनी किती कोटी रुपयांचा घोटाळा केला ? किती व कोण कोणत्या विमा कंपन्याकडून फायदा करून घेतला यासह अन्य कारणास्तव डॉ आर डी शेंडगे यांची अटकपूर्व जामीन अर्ज उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांनी २६ आक्टोबर रोजी फेटाळला तर त्यानंतर शेंडगे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मात्र तो परत घेतला.
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे करीत आहेत.विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले.
डॉ शेंडगे हे करीत असल्याच्या कृत्याचा फटका जेव्हा लॅब टेक्निशियन बनसोडेला बसला तेव्हा त्याने तक्रार केली. डॉ शेंडगे यांनी बनसोडे आजारी नसताना आजारी असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या नावाने विमा कंपनीकडुन वैद्यकीय बिल उचलले त्यानंतर बनसोडे व डॉ शेंडगे यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि सर्व भांडाफोड झाला.